बीव्हीजी, एनव्हायरोकडून कचरा संकलनास आणखी विलंब
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/pcmc-main.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याचे काम ए. जी. एनव्हायरो इंफ्रा आणि बीव्हीजी या दोन ठेकेदारांना मिळाले आहे. महापालिकेने दोघांनाही कामाचे आदेश दिले असताना त्यांच्याकडून काम सुरू करण्यास विलंब होत आहे. बीव्हीजी कंपनीने १ एप्रिलपासून तर ए. जी. एनव्हायरो कंपनीने १ मेपासून कचरा गोळा करण्याची तयारी दर्शविली आहे.
पुणे-मुंबई जुन्या महामार्गानुसार शहराचे दक्षिण व उत्तर असे दोन भाग करून दोन ठेकेदारांना हे काम देण्यात येत आहे. त्या भागातील घरोघरचा कचरा गोळा करून तो वाहनांतून मोशी कचरा डेपोत नेऊन टाकण्याचे काम आहे. दक्षिण भागासाठी ए. जी. इन्व्हायरो इंफ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि आणि उत्तर भागासाठी बी.व्ही.जी. इंडिया लि. या कंपनीने काम घेतले. निविदेवरील आरोप आणि न्यायालयातील याचिकेमुळे संपूर्ण वर्षभर ही निविदाप्रक्रिया वादात अडकली होती. .
दरम्यान, दर कमी करण्याच्या प्रस्तावानुसार अंमलबजावणी करण्याबाबत न्यायालयाने ठेकेदारांच्या बाजूने निकाल दिला. त्यानुसार या दोन्ही ठेकेदारांना महापालिकेने आठ वर्षांसाठी कामाचे आदेश दिले आहेत. ही निविदाप्रक्रिया रखडल्याने मागील वर्षभर शहरात कचरा संकलनाची बोंब झाली होती. आता त्याच ठेकेदारांना काम मिळूनही त्यांच्याकडून काम सुरू करण्यास विलंब केला जात आहे. या दोन्ही ठेकेदारांनी अद्याप काम सुरू केले नसून यंत्रणा व मनुष्यबळ उभे करण्यासाठी कालावधी मागितला आहे. त्यानुसार बीव्हीजी कंपनीने येत्या १ एप्रिलपासून, तर ए. जी. एनव्हायरो कंपनीने १ मेपासून काम सुरू करणार असल्याचे कळविले आहे. त्यानुसार बीव्हीजीला दहा दिवस, तर एनव्हायरो कंपनीला आणखी सव्वा महिना काम सुरू करण्यास विलंब लागणार आहे..