बाल कामगार विरोधी जनजागृती मोहीम, पुणे जिल्हा कामगार उपायुक्त कार्यालयाचा उपक्रम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Frame-copy-1.jpg)
- पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पुणे जिल्हा कामगार उपआयुक्त कार्यालयाच्या वतीने सध्या बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती प्रबोधन पर्व सुरू असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी पथकांची नेमणूक करून विविध आस्थापना व साईटवर जनजागृती करण्यात येत आहे.
बालकामगार प्रथेनुसार बालकांना शिक्षणापासून वंचित ठेवत त्यांना कामावर ठेवण्यात येते, त्यामुळे बालकांचा बौद्धिक विकास होत नाही. खुप कमी वयात कष्टाचेही काम करावे लागते. ही बालकामगार प्रथा बंद करण्यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी कठोर पाऊले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने आता ०७ नोव्हेंबर ते ०७ डिसेंबर २०१९ या महिन्याभरात जिल्ह्यातील विविध भागात या प्रथेविरोधी जनजागृती करण्यात येत असून त्याची बालकामगारांशी संबंधित असणाऱ्या स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविका व कामगार अधिकारी यांच्या पथकानुसार कामगार काम करत असणाऱ्या आस्थापनांच्या बैठका घेऊन त्यांना माहिती देण्यात येत आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/457-3.jpg)
अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या पालकांनाही बाल कामगार कायदा व त्यांच्या शिक्षणाचे महत्व याची माहिती देण्यात येत आहे. फिरत्या वाहनाद्वारे प्रमुख बाजारपेठा शहरातील सर्व मॉल येथे सेल्फी पॉईंट करण्यात आले आहेत. हायटेक जनजागृतीवरही जोर देण्यात आला आहे. तसेच, साईटवरील मालकांकडून बालकामगार कामावर न ठेवण्याचे हमीपत्र घेण्यात येत आहे. स्टिकर व पत्रकाच्या माध्यमातून याचा प्रसारही करण्यात येत आहे.
बालकामगार विरोधी जनजागृती मोहीम पुणे जिल्हा कामगार उपायुक्त विकास पनवेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून बालकामगार विरोधी कायद्यानुसार कुणीच आपल्या साईटवर व आस्थापनेवर बालकामगार कामावर ठेऊ नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे.