बालवाडी कर्मचा-यांच्या मानधन वाढीला शिक्षण समितीचा ‘हिरवा कंदील’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/pcmc-1_20180482470.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बालवाडीतील मुख्य समन्वयक, विभागीय समन्वयक, सेविका अशा एकूण 212 कर्मचा-यांच्या मानधनात वाढ करण्याच्या प्रस्तावाला शिक्षण समितीने मान्यता दिली. पूर्वीच्या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ देण्याची मागणी सदस्या सुलक्षणा धर यांनी प्रस्तावाच्या माध्यमातून केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 207 बालवाड्या आहेत. तब्बल 212 कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, गेल्या सहा वर्षात त्यांच्या मानधनात वाढ झालेली नाही. त्यांच्या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव नगरसेविका सुलक्षणा धर यांनी ठेवला आहे. त्याला निर्मला गायकवाड यांनी अनुमोदन दिले आहे. या विषयाला सभापती मनिषा पवार यांनी मान्यता दिली आहे.
मानधनात अशी करावी वाढ
पाच वर्षांपर्यंत सेवा झालेल्या कर्मचा-यांना 9 हजार मानधन द्यावे, 10 वर्ष सेवा झालेल्या कर्मचा-याला 10 हजार वाढीव वेतन द्यावे, 15 वर्ष सेवा झालेल्या कर्मचा-याला 2 हजाराच्या वाढीप्रमाणे 11 हजार रुपये द्यावेत, 20 वर्षे सेवा झालेल्या कर्मचा-याला वाढीसह 12 हजार रुपये द्यावेत, 20 वर्षे सेवा झालेल्या कर्मचा-यांना 13 हजार रुपये वाढीचे वेतन द्यावे, 30 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचा-याला वाढीसह 15 हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी सूचना नगरसेविका सुलक्षणा धर यांनी प्रस्तावात केली आहे.