बार्सिलोना दौ-यानंतर महापौर हायटेक?; मनपाकडून 74 हजारांचा टॅब खरेदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Rahul-Jadhav-784x441.jpg)
- अॅपल कंपनीचा टॅब केला खरेदी
- स्थायीने दिली कार्योत्तर मान्यता
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरांसह आयुक्त आणि अन्य पदाधिका-यांचा बार्सिलोना दौरा नुकताच पार पडला आहे. बदलत्या जगात हायटेक होण्याकडे सर्वांचा कल असतानाच या दौ-यानंतर पिंपरीचे महापौर देखील आता हायटेक झाले आहे. कामकाजासाठी त्यांनी टॅबची मागणी करताच महापालिकेकडून तातडीने 74 हजार रुपयांचा टॅब खरेदी करून त्यांना देण्यात आला आहे. त्याबाबतच्या खर्चाला स्थायी समितीने आज मंगळवारी (दि. 4) मंजुरी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत पारदर्शक कारभाराची प्रथा सुरू करणा-या सत्ताधारी भाजपने आर्थिक बचतीचे धोरण आखले आहे. सुरूवातीला पदाधिका-यांनी सरकारी मोटारी वापरणे बंद केले. पेट्रोल-डीझेलचा खर्च सुध्दा अजिबात घेत नसल्याचे हे पदाधिकारी छातीठोक सांगत आहेत. एवढेच नव्हे तर, पुष्पगुच्छ न घेणे, रंगीत निमंत्रण पत्रिका न छापणे, स्मृतिचिन्ह खरेदी न करणे, सभागृहातच कार्यक्रम घेणे, असे अनेक निर्णय घेतले. यातील एकही निर्णय या पदाधिका-यांनी पारदर्शकपणे आमलात आणला नाही. त्यामुळे पारदर्शक कामकाज काय असते ते पालिकेतील या पदाधिका-यांकडूनच शिकायला हवे, अशी उपरोधीत टिकाही पालिकेतील विरोधकांमध्ये केली जात आहे.
त्यातच स्मार्ट सिटीत शहराचा समावेश झाल्यानंतर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या परदेश दौ-याची मालिकाच सुरू झाली आहे. या शिष्टमंडळाचा नुकताच बार्सिलोना दौरा पूर्ण झाला आहे. त्यात महापौर राहूल जाधव हे देखील सहभागी होते, असे ते स्वतः सांगतात. या दौ-यावरून ते परतल्यानंतर ते आता कमालीचे हायटेक झाले आहेत. सभा कामकाज, शहरातील समस्या, नागरिकांची विविध कामे तसेच कार्यालयीन कामकाज सुलभतेने करण्यासाठी महापौर राहुल जाधव यांनी “अॅपल” या नामांकीत कंपनीचा टॅब खरेदी केला आहे.
युनिवॅक्स मार्केटींग यांच्याकडून 74 हजार रुपयाला हा ‘अॅप’ खरेदी केला आहे. त्या खर्चाला आज मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत कार्योत्तर मान्यता दिली आहे. मुळात गाववाल्यांमध्ये अॅपल कंपनीच्या मोबाईल, टॅबची क्रेझ आहे. त्यामुळे या कंपनीला प्राधान्य दिले जात आहे. पालिकेतही या कंपनीचे नवनवीन मॉडेल घेऊन मार्केटींग करण्यासाठी त्या कंपनीच्या प्रतिनिधींचे दौरे वाढत चालले आहेत. स्वतःला हायटेक बनविण्यासाठी पदाधिकारी त्याचा पुरेपूर फायदा करून घेत आहेत.