breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे नगरसेवकांवर उपकार करत नाही, निलंबित करा

  • नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला संताप
  • शिंदे यांच्या निलंबनाची सभागृहात केली मागणी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्याकडे शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरणाची माहिती मागितली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. ‘मी माहिती देऊ शकत नाही’, असे उध्दटपणे त्यांनी उत्तर दिले. अधिका-यांना एवढी मस्ती कशाला हवीय. ज्योत्स्ना शिंदे यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सर्वसाधारण सभेत केली.

महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेत काटे यांनी प्रशासनाच्या चुकीच्या कामकाजाचा बुरखा फाडला. एक महिन्यापूर्वी पती-पत्नी एकत्रीकरणासाठी आलेल्या अर्जांची माहिती मागितली होती. चारवेळा मोबाईलवर संपर्क साधून झाला. तरीही माहिती दिली नाही. शेवटी मी माहिती देऊ शकत नाही, असे उत्तर शिक्षण विभागाच्या शिंदे यांनी दिले. आज महासभा असल्यामुळे काल ही माहिती माझ्या हाती आली. माहिती देण्यास एवढी दिरंगाई का केली गेली. ही माहिती दडवण्यामागे काहीतरी गौडबंगाल आहे. याचा खुलासा ज्योत्स्ना शिंदे यांनी करावा, अशी मागणी काटे यांनी सभागृहात गुरूवारी (दि. 20) केली.

प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे खुलासा देताना म्हणाल्या, माहिती उपलब्ध करण्याची जबाबदारी संबंधित विभागातील लिपिकाची असते. त्यांच्याकडून जोपर्यंत माहिती समोर येत नाही. तोपर्यंत माहिती देऊ शकत नव्हते, म्हणून मी माहिती देऊ शकले नाही, असे उत्तर काटे यांना दिले, असा खुलासा करत शिंदे यांनी काटे यांचा आरोप फेटाळून लावला.

त्यावर अधिका-यांना माहिती दडवण्याचा अधिकार बिलकूल नाही. ज्योत्स्ना शिंदे यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी करत काटे यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. अधिकारी काही नगरसेवकांवर उपकार करत नाहीत. काम जमत नसेल तर त्यांना घरी पाठवा, अशी सूचनाही त्यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना केली. शेवटी आयुक्त आणि महापौर एकमेकांच्या चेह-याकडे पाहू लागले. रहाटणीचे नगरसेवक चंद्रकांत नखाते आणि शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी मध्यस्ती केल्याने काटे यांनी आपली तलवार म्यान केली. परत, प्रशासनाकडून अशा चुका होणार नाहीत, असा समज संबंधित अधिका-यांना देण्यात यावा, अशी सूचना देऊन काटे खाली बसले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button