प्रथा, परंपरेवर नगरसेवकांचा बोगस कारभार, मृत्यू झालेल्या व्यक्तींचा स्मशान दाखल्यास शिफारस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Graveyard-696x447.jpg)
- पिंपरी चिंचवड महापालिका नगरसेवकांचा बोगस कारभार
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा बोगस कारभार उघडकीस आला आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नैसर्गिकरित्या अथवा 60 वर्षापेक्षा जास्त असलेला व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नगरसेवकांकडून स्मशान दाखला देण्यास शिफारस पत्र देण्यात येते. मात्र, त्या शिफारस पत्रावरुन महापालिका दवाखाने, रुग्णालयाकडून अंत्यविधीसाठी स्मशान पास देण्यात येत होते. परंतू, सदरील स्मशान दाखल्याची शिफारस देण्यास कोणती कायदा अथवा ठराव केलेला नाही. त्यामुळे महापालिकेचे नगरसेवक बेकायदेशीरपणे व नियमबाह्य शिफारसपत्रे देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेवकांनी स्मशान दाखल्यासाठी दिलेल्या शिफारसपत्रामुळे अनैसर्गिक मृत्यू दडपले जाऊ शकतात. मृत्यूबाबत घोषणा करण्याचा अधिकार कायद्याने फक्त डॉक्टरांनाच असतो. अनैसर्गिक मृत्यू झालेल्या एखाद्या ज्येष्ठ नागरिकास नगरसेवकाने नैसर्गिक मृत्यू होऊन स्मशान दाखल्यासाठी शिफारसपत्र दिले आणि कालांतराने तो खून असल्याचे उघडकीस आल्यास, तो नगरसेवक पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केल्याच्या आरोपाखाली सहआरोपी होण्याची दाट शक्यता आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत स्मशान दाखला देण्याबाबत सर्वसाधारण सभेत कोणताही ठराव झालेला नाही. नगरसेवकांना अशाप्रकारची शिफारसपत्रे देण्याची कायद्यात तरतूदही नाही. याबाबत वैद्यकीय विभागाकडून स्थायी समिती बैठकीत माहिती देण्यात आली आहे. ही बाब वैद्यकीय विभागाने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी 11 जूनला परिपत्रक काढून स्मशान दाखल्याची ती शिफारसपत्रे ग्राह्य धरू नयेत, असे स्पष्ट केले.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम), चिंचवडमधील तालेरा रुग्णालय, पिंपरीतील जिजामाता रुग्णालय, सांगवी रुग्णालय, थेरगाव रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, आकुर्डी रुग्णालय आणि भोसरी रुग्णालयात मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशान दाखला देण्याची सुविधा 24 तास उपलब्ध आहे. तसेच, महापालिकेच्या 24 दवाखान्यांतही कार्यालयीन वेळेत (सुटीचे दिवस वगळून) ही सुविधा असेल.
दरम्यान, महापालिकेच्या स्थायी समिती सभेत ज्या व्यक्तीचा अनैसर्गिक मृत्यू झाला असेल, त्यांना स्मशान दाखला शिफारस पत्र देण्यासाठी तज्ञ तीन डाॅक्टराची समिती स्थापन करावी, ते डाॅक्टर सदरील व्यक्तीचा मृत्यू कशाने झालाय याची तपासणी करुन त्यानंतरच दाखला देण्यात यावा, अशा सुचना स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी यांनी प्रभारी आयुक्त मंगेश चितळे यांना दिले आहेत.
![](https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/images/cleardot.gif)