पोलीस ठाण्याच्या इमारतीवरुन उडी मारुन पोलीस शिपायाचा आत्महत्येचा प्रयत्न
![Attempted suicide by a police constable by jumping from a police station building](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/उडी.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
पोलीस शिपायाने पोलीस ठाण्याच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही घटना दिघी पोलीस ठाण्यात १ जानेवारी २०२१ रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तब्बल १८ दिवसांनी पोलीस शिपायावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत पोलीस शिपायाचे प्रेमसंबंध असताना झालेल्या वादातून ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबधीत पोलीस शिपायाचे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिक्षक महिलेसोबत मागील दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, दोघांमध्ये वाद झाला. याच रागातून पोलिस शिपायाने संबंधित महिला पोलीस उपनिरीक्षकास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी दिली. त्यानंतर पोलीस स्टेशनच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटना घडल्यानंतर १८ दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यास एवढा उशीर का झाला याची माहिती मिळू शकली नाही. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.