पूराच्या पाण्याने नदी पात्रातील जलपर्णी गेली वाहून

पिंपरी – सलग दोन दिवस पडणा-या पावसाने पवना नदीला पूर आला आहे. नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे पात्रातील बहुतांशी जलपर्णी वाहून गेली आहे. जलपर्णी वाहून गेल्याने पवना नदीने मोकळा श्वास घेतला आहे.
पवना नदीच्या पात्रात किवळे गावठाण , स्मशानभूमी , देहूरोड – कात्रज बाह्यवळण महामार्गावरील नदीच्या पुलापासून ते रावेत गावाशेजारी असणाऱ्या बंधाऱ्यापर्यंत विविध ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाली होती. किवळे व रावेत परिसरात नदीत पाण्याऐवजी संपूर्ण जलपर्णीचे आच्छादन दिसू लागले होते. जलपर्णीमुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या तक्रारी नागरिक करत होते. मात्र, महापालिका प्रशासनाने जलपर्णी काढण्याबाबत चालढकल होत होती . गेल्या आठवडाभरात मावळात दमदार पावसाने पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या येणाऱ्या मोठ्या लोंढ्याने किवळे , रावेत परिसरातील सर्व जलपर्णी वाहून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे .




