पुण्यात पेट्रोल पुन्हा महागले ; प्रति लिटर दर ८६ रुपयांवर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/petrol-5.jpg)
पुणे – इंधनाच्या दरवाढीचा भडका थांबण्याची सध्या कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर तब्बल ८६ रुपयांवर पोहोचला आहे. मंगळवारी पहाटेपासून शहरातील पेट्रोलचा दर ८६.०७ रुपये, तर डिझेलचा दर ७२.५१ रुपये राहणार आहे. मागील बारा दिवसांत पेट्रोलच्या प्रतिलिटर दरामध्ये सुमारे साडेतीन रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खर्चाचे गणित कोलमडून पडले आहे. पुण्यामध्ये १६ मे रोजी पेट्रोलचा दर ८२.८० रुपये होता. बाराच दिवसात त्यात सुमारे तीन ते साडेतीन रुपयांनी वाढ झाली आहे. बारा दिवसांपूर्वी डिझेलचा प्रतिलिटर दर ६९.६७ रुपये होता. तो आता ७१.५१ रुपयांवर गेला आहे.
१६ मे रोजी पॉवर पेट्रोलचा ८५.५६ रुपये होता. तो ८८.८३ रुपयांवर पोहोचला आहे. खासगी वाहनांची सर्वाधिक संख्या असलेल्या पुण्यात प्रामुख्याने पेट्रोलच्या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. त्याचप्रमाणे डिझेलच्या दरामध्ये झालेली वाढ लक्षात घेता पुण्यात खासगी प्रवासी वाहतूक ३० मे पासून, तर मालवाहतुकीत १ जूनपासून दरवाढ करण्याचा निर्णय वाहतूकदारांनी घेतला आहे. त्याचा फटका थेट नागरिकांना बसणार आहे.