पुण्यात ड्युटीवरून घरी आल्यानंतर महिला पोलिसाची आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Suicide.jpg)
पुणे – तळेगाव दाभाडे येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल ने राहत्या घरी बेडरूममध्ये दोरीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. सरस्वती किसन वाघमारे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होत्या. मात्र, कार्तिकी एकादशीनिमित्त देहूगाव येथे पोलीस बंदोबस्तासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. शनिवारी त्यांना नाईट ड्युटी असल्याने त्या रात्री नऊच्या सुमारास देहूगाव येथे बंदोबस्तासाठी गेल्या. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता घरी येणार असल्याचे सांगून गेल्या होत्या.
मात्र, रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास त्या अचानक घरी आल्या. त्यांचे पती विकास पांडुरंग झोडगे यांनी लवकर येण्याबाबत विचारले असता सरस्वती काहीही न बोलता बेडरूममध्ये गेल्या. झोपेची वेळ असल्याचे विकास यांनी देखील जास्त माहिती न घेता झोपी गेले. सकाळी सव्वासातच्या सुमारास विकास पत्नी सरस्वती यांना झोपेतून उठवण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये गेले असता त्यांनी दोरीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. सरस्वती यांचे पती विकास जातपडताळणी कार्यालय येरवडा येथे मानधन तत्वावर नोकरीस आहेत. त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे.
सरस्वती कर्जबाजारी होत्या. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली, असावी तसेच पती-पत्नीचे भांडण झाले. त्या रागातून वाघमारे यांनी आत्महत्या केली असावी असे तर्क-वितर्क आत्महत्येबाबत पोलीस सध्या काढू लागले आहेत. या घटनेसंबंधी मृत्यूमुखी पडलेल्या सरस्वती यांचे वडील किसन वाघमारे यांनी पती विकास झोडगे यांच्याविरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अधिक तपास देहूरोड पोलिस करत आहेत.