‘पीएमपीएमएल’ने सर्वोत्तम सेवेची हमी द्यावी – महापौर माई ढोरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/4758.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
‘पीएमपीएमएल’ने उत्पन्नवाढीसाठी नवनवीन उपाययोजना राबवाव्यात व सर्वोत्तम सेवेची हमी नागरिकांना द्यावी, अशा सूचना महापौर माई ढोरे यांनी ‘पीएमपीएमएल’च्या अधिका-यांना बैठकीत केल्या.
‘पीएमपीएमएल’मार्फत देण्यात येणा-या सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज स्थायी समिती सभागृहामध्ये ‘पीएमपीएमएल’चे अधिकारी व मनपाचे अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएमएलच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, उपसंचालक नगररचना राजेंद्र पवार, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव झुंदारे, प्रमोद ओंबासे व पीएमपीएमएलचे अधिकारी उपस्थित होते.
महापौर ढोरे म्हणाल्या की, सेवा सुधारण्यासाठी पीएमपीएमएलने विशेष प्रयत्न केल्याशिवाय नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडणार नाहीत. शहरात आज विविध संधी उपलब्ध असून आयटी कंपनी, शाळा, महाविद्यालय यांच्यासाठी विशेष चांगली सुविधा दिल्यास त्याचा उत्पन्नवाढीसाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, पीएमपीएमएलच्या नियोजनानुसार बसेसच्या फे-या होत नसून त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी. कामचुकार कर्मचा-यांवर कडक कारवाई करावी व प्रशिक्षित कर्मचा-यांची भरती करावी. रोज रस्त्यांवर बसेस बंद पडत असून त्याबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. इथून पुढे महिन्यातील एका स्थायी समिती बैठकीमध्ये शहरातील प्रत्येक डेपो मॅनेजरच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी म्हणाले, रोजच्या नियोजित फे-या व प्रत्यक्षात झालेल्या फे-या याबाबतची माहिती देणारा फलक मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात यावा. जे ड्रायव्हर व कंडक्टर नेहमीच्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न मिळवून देतील त्यांच्यासाठी बक्षिस योजना राबविण्यात यावी.
पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे म्हणाल्या की, पीएमपीएमलच्या सेवेमध्ये सुधारणा आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. उत्पन्न वाढीसाठी प्रायोगिक तत्वावर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मनपाच्या ताब्यातील काही जागा पीएमपीएमएलला डेपोसाठी व पार्किंगसाठी देण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.