पिंपळे गुरवमधील उद्यानासाठी मनपाच्या तिजोरीचे दार सताड उघडे
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी तब्बल 3 कोटी 55 लाखांचा खर्च केला जात आहे. गेल्या चार वर्षापूर्वी सुरू झालेले या उद्यानाचे काम अद्याप पूर्ण नसताना पुन्हा स्थापत्य आणि विद्युत विषयक कामे काढून त्यावर साडेतीन कोटींच्या खर्चाचा घाट प्रशासनाने घातला आहे. त्यामुळे पिंपळे गुरवमधील या उद्यानासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीचे दार सताड उघडे असते, याची अनुभूती येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथे राजमाता जिजाऊ उद्यान विकसित करण्यात येत आहे. त्याचे काम गेल्या चार वर्षापूर्वी सुरू करण्यात आले आहे. अधीच कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना आता पुन्हा पालिकेच्या अधिका-यांनी या उद्यानातील स्थापत्य आणि विद्युत विषयक कामे काढली आहेत. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. चार निविदा आल्याने सर्वात कमी दराची निविदा विचारात घेऊन मे. एस. एस. साठे या ठेकेदाराला हे काम देण्यात येत आहे. या ठरावाला आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी 9 जानेवारी 2019 रोजी मान्यता दिली आहे.
या कामासाठी साठे यांची शून्य टक्के दराने निविदा आल्याने त्याला हे काम देण्यात येणार आहे. या कामावर 3 कोटी 55 लाख 8 हजार 466 एवढ्या रक्कमेत काम करून घेण्यात येणार आहे. या उद्यानावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. त्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. मात्र, स्थायीची बैठक आज रद्द झाल्याने पुढच्या बैठकीत या खर्चाच्या विषयाला मंजुरी दिली जाणार आहे.