breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी महापाैरांकडून ‘राष्ट्रगीता’चा अवमान; राष्ट्रवादीकडून भाजपचा जाहीर निषेध

महासभेत गोंधळ होताच महापाैर अचानक उठून निघून गेल्या, महासभा नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापाैर उषा ढोरे यांच्या निवडीनंतर पहिल्यादांच महासभेला आज (सोमवारी) सामोरे गेल्या. शहरातील भू-संपादन खाजगी वाटाघाटी प्रस्तावावरुन सभागृहात गोंधळ झाला. सत्ताधारी भाजप नगरसेवकांसह विरोधकांनी त्यावर बोलू देण्याची विनंती महापाैरांना केली. मात्र, शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी मानदंड धरताच महापाैर खुर्चीवरुन अचानक उठून सभेचे कामकाज तहकूब करीत सभागृहातून बाहेर पडल्या. त्यामुळे राष्ट्रगीत न करताच महासभेचे कामकाज तहकूब केले. यावरुन भाजप महापाैरांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

महापालिकेची डिसेंबर महिन्यांची तहकूब सभा आज (सोमवारी) घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर उषा ढोरे होत्या. या सभेच्या विषयपत्रिकेवर खासगी वाटाघाटीद्वारे भू-संपादन करताना नुकसान भरपाई देण्याचे धोरण 2013 मध्ये महापालिकेने निश्चित केले आहे. त्या धोरणात पुन्हा बदल करण्यात येत आहेत. यावरुनच भाजप नगरसेवकांमध्ये दोन गट पडले आहेत.

भाजपच्या पक्षाच्या बैठकीत विषय तहकूब ठरले होते. त्यामुळे नगरसेवक सागर अंगोळकर यांनी खासगी वाटाघाटीद्वारे भू-संपादनाचा विषय वाचला. त्याला अंबरनाथ कांबळे यांनी अनुमोदन देताच महापौर ढोरे यांनी हा विषय तहकूब केल्याचे सांगितले. तहकुबीला आक्षेप घेत भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी महापौरांसमोर धाव घेतली. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केल्या. त्यानंतर कोणतीही सूचना आणि अनुमोदन नसताना महापौरांनी महासभा तहकूब करुन त्या आसनावरुन उठून गेल्या.

त्यानंतर नगरसचिव उल्हास जगताप यांनी महापौरांनी महासभा तहकूब केली आहे. तहकुबीची तारीख नंतर कळविली जाईल, असे नगरसेवकांना सांगितले. त्याला राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी हारकत घेतली. त्यानंतर भाजप नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांनी भाजप नगरसेवकांना सभा तहकूब झाली असून सभागृहाबाहेर येण्याचे आवाहन केले. त्यानंतर देखील राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेविका सभागृहात बसून होत्या.

तब्बल अर्धा तासानंतर महापौर ढोरे सभागृहात आल्या. त्यांनी आजची महासभा शुक्रवार (दि. 10) दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केल्याचे जाहीर केले. दुस-यावेळी देखील कोणीतीही सूचना न मांडता महापौरांनी सभेचे कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब केले. महापौर ढोरे यांची पहिली सभा तहकूब झाली होती. कामकाजाची आजची त्यांची सभा देखील गोंधळातच तहकूब झाली.

त्यावर दत्ता साने म्हणाले की, पिंपरी चिंचवडच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. महासभा कामकाज नियमाचे उल्लंघन केले आहे. महासभा अचानक तहकूब करताना सुचना व अनुमोदन दिले गेले नाही. त्यानंतर राष्ट्रगीत देखील घेतले नाही. महापाैर त्यांच्या दालनात जावून बसल्या होत्या. त्यांनी सभा तहकूब केल्यानंतर राष्ट्रगीत करणे गरजेचे होते. मात्र, तसे त्यांनी केलेले नाही. त्यामुळे महापाैरांनी राष्ट्रगीताचा अवमान केला असून त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button