पिंपरी चिंचवड महापालिकेतही लावली संरक्षण जाळी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/140ea2bc6b4035be6940a56296e79124_XL.jpg)
आंदोलकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने घेतली काळजी
पिंपरी – शासन स्तरावरुन मागण्या मान्य न झाल्याने नैराश्य आलेल्या लोकांकडून प्रशासनाला आत्महत्येचा इशारा देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातील काही जीवावर उदार होवून स्वताः आत्महत्याही करु लागले आहेत. मुंबई मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्यामुळे मंत्रालयात संरक्षण जाळी लावण्यात आली. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेतही आंदोलकांच्या सुरक्षेसाठी संरक्षण जाळी लावण्यात आली आहे.
याबाबत महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे महापौर नितीन काळजे यांनी सुरक्षा जाळी बसविण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. यापुर्वी महापालिका प्रशासनाकडे अनेकांनी महापालिका इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिलेला आहे. तसेच महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावरुन एकाने उडी मारुन आत्महत्या केलेली आहे. त्या घटनामुळे महापालिका प्रशासनाने वेळीच खबरदारी घेवून संरक्षण म्हणून महापालिकेच्या गॅलरीमध्ये पहिल्या मजल्यावर सुरक्षा जाळ्या बसविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने आज (सोमवारी) जाळी बसविली आहे.