पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी पावसाची हजेरी, पादचा-यांची तारांबळ
पिंपरी – उद्योगनरीत रविववारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरवासी सुखावले असून, वातावरणात गारवा झाल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान काही ठिकाणी जाहिरात फलकांचे नुकसान झाले असून झाडांच्या फांद्या पडल्या. तसेच वाहनचालक आणि पादचाऱ्यांची तारांबळ उडाली होती.
पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. मात्र त्यावेळी केवळ शिडकावा केल्यासारखा पाऊस झाला. उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र शनिवारी आणि सलग रविवारीही मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. रविवारी दुपारनंतर वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली. सायंकाळी आकाशात ढग जमा झाले होते. काळ्या ढगांमुळे पावसाचे वातावरण झाले होते. पावणेसहाच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुरु झाला. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांची कसरत झाली. सहाच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. खरेदीला बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली.