breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बुक स्टॉल’ला लॉकडाऊनमधून सूट द्या – राष्ट्रवादी कार्यकर्ते संदीप काटे

पुस्तकांअभावी ‘सीबीएसई’ बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान?

– उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना (कोविड -१९) विषाणुच्या प्रादुर्भावास अटकाव व्हावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने देशभर लॉकडाऊन लागू केला. त्यामुळे देशासह राज्यातील आणि पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा व महाविद्यालये बंद आहेत. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या अनुषंगाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) १ एप्रिल २०२० रोजी देशातील ‘सीबीएसई’ बोर्डाच्या शाळा व्यवस्थापनांना ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना पुस्तकांची कमतरता भासू लागली आहे. लॉकडाऊनमुळे पाठ्यपुस्तकांची दुकानं बंद आहेत. राज्य सरकारने राज्यात आणि महापालिका आयुक्तांनी पिंपरी-चिंचवड शहरात पाठ्यपुस्तकांच्या दुकानांना लॉकडाऊनमधून वगळावे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदी करण्यासाठी शहरातील दुकानं उघडी ठेवण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

कार्यकर्ते काटे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवडसह देशभरात ‘सीबीएसई’ शाळांकडून १ एप्रिलपासून ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. ‘सीबीएसई’ने मुलांच्या उन्नतीसाठी ई-स्कूल तयार केले आहे. विद्यार्थ्यांसाठी थेट आणि व्हिडिओ वर्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व शाळा ऑनलाइन वर्गांसाठी ‘टीव्ही’, ‘यू ट्यूब’, ‘व्हॉट्सअॅप’ आणि इतर ‘ऑनलाईन’ माध्यमांचा वापर करीत आहेत. ‘सीबीएसई’ बोर्डाच्या कोणत्या विषयाचा वर्ग कोणत्या वेळेत घेण्यात येईल आणि कोणता धडा शिकविला जाईल, याबाबत शाळा व्यवस्थापन मोबाइलवर किंवा ई-मेलद्वारे संदेश पाठवून आपल्या विद्यार्थ्यांना माहिती देत आहेत. शाळा फोन इन प्रोग्राम, स्टुडिओ क्लासद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवीत आहेत. एखादा विद्यार्थी ऑनलाईन वर्गास उपस्थित राहू शकत नसेल त्याला यूट्यूब हे माध्यम आहे. कारण दररोज त्यांच्या मोबाईलवर क्लासेसचे व्हिडिओ पाठवले जातात. गृहपाठ पूर्ण करून घेण्यासाठीही ते जबाबदार आहेत, असेही काटे यांनी म्हटले आहे. 

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे फारसे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना ऑनलाइन वर्ग दिले जात आहेत. टेक्स्ट बुक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्ग संपल्यानंतर रिव्हिजनसाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच विषय समजून घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्यांकडे एकच पर्याय शिल्लक आहे, एनसीईआरटी वेबसाइटवरून पुस्तके डाउनलोड करणे शक्य आहे. मात्र, काही मुलांवर याचा अतिरेक होताना दिसून येत आहे. तर काहींना सवयच नसल्यामुळे अभ्यास करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना टेक्स्ट बुकची गरज भासू लागली आहे, असेही काटे यांनी म्हटले आहे. 

दिल्लीच्या धर्तीवर शहरात अंमलबजावणी करा

दिल्ली सरकारने सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा विचार करून तेथील बुक स्टॉल सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. याच धर्तीवर या सर्व बाबींचा विचार करून, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील पाठ्यपुस्तकांच्या दुकानांना लॉक डाऊनमधून सूट द्यावी, जेणेकरून मुलांना अभ्यास करण्यासाठी पाठ्यपुस्तके सहजपणे उपलब्ध होतील, असेही काटे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button