पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांना ‘व्हेंटिलेटर’,’आयसीयू’चे बेड मिळेना; मनसेचे अनोखे आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/2-7.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाच्या गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयूचे बेड मिळेना झाले आहेत. त्यातच महापालिकेचे जॅम्बो कोविड सेंटर सुरु होईना झाले आहे. त्यामुळे मनसेने प्रतिकात्मकपणे कोविड रुग्णांना महापालिकेसमोर झोपवून आयुक्तांचा निषेध नोंदवित आज (बुधवारी) प्रवेशद्वारासमोर अनोखे आंदोलन केले.
मनसेचे पालिकेतील गटनेते, शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राजू साळवे, विशाल मानकरी, बाळा दानवले, मयुर चिंचवडे, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, रवी जाधव सहभागी झाले होते.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गंभीर आजार असलेल्या रुग्णांचे प्रमाणही जादा आहे. या रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयूचे बेडची आवश्यक असते. पण, त्यांना बेड उपलब्ध होत नाही. कोरोनामुळे दिवसाला 20 ते 25 जणांचा मृत्यू होत आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/IMG-20200819-WA0014-1-1024x576.jpg)
शहरातील सद्याची स्थिती पाहाता सरकारी व खाजगी हॉस्पिटल कोरोना रुग्णांनी फुल्ल आहेत. यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयातील आर्थिक खर्च परवडत नसल्यामुळे किंवा अशा लोकांना शहरामध्ये आयसीयु व व्हेंटीलेटरची सुविधा मिळत नसल्यामुळे कोरोना रुग्ण दगावत आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केल्याचे चिखले यांनी सांगितले. शहरामध्ये आत्तापर्यंत 685 कोरोना रुग्ण मृत झालेले आहेत, असेही ते म्हणाले.