पिंपरी चिंचवडमधील १९ खासगी शाळांना नोटीस
![Parents should not admit their children in 'Ya' unauthorized schools in Pimpri-Chinchwad - Jyotsna Shinde](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/school-.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
कोरोना पार्श्वभूमीवर राज्य शासन शाळा कधी सुरू करणार याबाबात अद्याप काहीही माहिती नाही. असे असतानाच शाळेत प्रवेश घेऊन नवीन शैक्षणिक वर्षाचे संपूर्ण शुल्क भरावे यासाठी खासगी शाळांनी तगादा लावला आहे. शासनाने शुल्कासाठी सख्ती करु नये, असे आदेश दिलेले असतानाही शाळांकडून वसुली सुरु आहे. शहरातील 19 खासगी शाळांना याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून समाधानकारक खुलासा न केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे.
करोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक कामांवर करोनाचा दुष्परिणाम जाणवज आहे. सर्वसामान्य यामुळे प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. शहरातील अनेक खासगी शैक्षणिक संस्थांनी पालकांना लुबाडण्याचा धंदा सुरू केला आहे. शाळा कधी सुरू होणार याबाबत काहीच माहिती नसताना संस्था प्रवेश घेण्यासाठी तगादा लावत आहे. त्यासाठी पालकांना थेट फोन करून पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी फी भरण्याचा आग्रह केला जात आहे.
शाळा सुरू करण्याबाबत शासनस्तरावर अद्याप काहीच निर्णय झाला नाही. मात्र शैक्षणिक संस्था शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यासारखे प्रवेश प्रक्रिया राबवून प्रवेश निश्चित करू लागले आहेत. विशेषतः इंग्रजी माध्यमातील ज्यूनिअर के जी, केजी, यासोबतच पहिली ते पाचवीसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पालकांना फोन करून शाळेत बोलावले जात आहे. तसेच शाळेत येऊन फी भरून तुमच्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. नंतर प्रवेश पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. परिणामी तुमच्या पाल्याचे वर्ष फुकट जाईल अशी भीती दाखवली जाते.
या शाळांविरुद्ध तक्रारी
शहरातील एसएनबीपी स्कूल रहाटणी व मोरवाडी, एल्प्रो स्कूल चिंचवड, न्यू पूना पब्लिक स्कूल निगडी प्राधिकरण, बचपन स्कूल दिघी, होली स्कूल पिंपळे सौदागर, आरएमडी स्कूल वाल्हेकरवाडी, साधू वासवानी स्कूल मोशी, ऑर्किड स्कूल निगडी, व्हिग्योर स्कूल पिंपळे सौदागर, विस्डम स्कूल विकासनगर किवळे, सेंट जोसेफ स्कूल विकासनगर किवळे, व्हिब्ग्योर स्कूल चिंचवडगाव, युरो किडस स्कूल चिंचवडगाव, अक्षरा इंटरनॅशनल स्कूल वाकड, व्हिब्स स्कूल विकासनगर किवळे, सेंट ऍन्ड्रयूज स्कूल चिंचवड, जयहिंद प्रायमरी स्कूल पिंपरी, डी वाय पाटील पब्लिक स्कूल पिंपरी या शाळांबाबत पालकांनी तक्रारी दिल्या आहेत.