पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची ‘I Love Ravet’फ्लेक्सबाजी
– नवीन वर्षाभिनंदनासह प्रभागातील नागरिकांचे लक्ष वेधले
– शहरातील स्थानिक नेत्यांना फ्लेक्सवर स्थान नाही?
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
नवीन वर्षांच्या निमित्ताने शहरातील काही लोकप्रतिनिधींनी फ्लेक्सद्वारे नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. रावेत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनीही प्रभागात फ्लेक्सबाजी केली आहे.
विशेष म्हणजे, I Love Ravet असा उल्लेख करीत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मोरेश्वर भोंडवे यांची फ्लेक्सबाजी आणि जाहीरातींवर भर देणारा नगरसेवक अशी ओळख आहे. काही वर्षांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईपासून बारामतीपर्यंत फ्लेक्सबाजी करीत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर चिंचवड विधानसभा निवडणुकीला इच्छुक असल्याने अनेकदा फ्लेक्सबाजीमुळे चर्चेत राहीले आहेत.
दरम्यान, नूतन वर्षाचे अभिनंदन करताना जाहिरात केलेले फ्लेक्स भोंडवे यांनी प्रभागात उभारले आहेत. औंध-रावेत बीआरटी रोडलगत संत तुकाराम उड्डाणपुलाशेजारी तसेच रावेतमधील चौकातून वाल्हेकरवाडीच्या दिशेने जाणाऱ्या रोडलगत भोंडवे यांनी फ्लेक्स झळकावले आहेत.
****
स्थानिक नेत्यांना स्थान नाही?
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे पदाधिकारी- नेते यांचे कान टोचले होते. स्थानिक पातळीवर एकोपा दिसला पाहिजे, अशी ताकीद दिली होती. मात्र, फ्लेक्सबाजी करीत असताना नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी स्थानिक नेत्यांना स्थान दिले नाही. फ्लेक्सवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, युवा नेते पार्थ पवार यांच्याशिवाय स्थानिक नेत्यांचे फोटो टाळले आहेत. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.