पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनाप्रतिबंध लस घ्यावी- आयुक्त राजेश पाटील
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाप्रतिबंधक लस देण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. या लसीकरणांतर्गत विविध आजारांनी त्रस्त असलेल्या ४५ ते ६० वयोगटातील ज्येष्ठांना लस देण्यात येणार असून मागील दोन दिवसात सुमारे एक हजारहून अधिक व्यक्तींनाही लस दिली आहे. उर्वरित ज्येष्ठ नागरिकांनी लस टोचून घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांनुसार साठ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणि ४५ वर्षांवरील विविध आजारांनी त्रस्त नागरिकांना एक फेब्रुवारीपासून कोरोनाप्रतिबंधक लस दिली जात आहे. महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय चिंचवड, पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, यमुनानगर रुग्णालय आणि ईएसआय हॉस्पिटल मोहननगर चिंचवड स्टेशन यांचा समावेश आहे. या आठ ठिकाणी कोरोनाप्रतिबंधक लस मोफत दिली जात आहे. तसेच, शहरातील इतर १२ खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, त्यासाठी 250 रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात येईल. तसेच सांगवीतील जिल्हा सामान्य रुग्णालयातही लसीकरणाची सोय केली आहे. तसेच लसीकरणाच्या ठिकाणी कोणीही पूर्व नोंदणी शिवाय अनावश्यक गर्दी करू नये. तसेच, त्या ठिकाणी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर ठेवावे, असेही आवाहन आयुक्त पाटील यांनी केले आहे.
या आजारग्रस्तांना वैद्यकीय प्रमाण अनिवार्य
ह्रदयविकार, मधुमेह, रक्तदाब, स्ट्रोक, मुत्रपिंडाशी (किडनी), यकृत, श्वसन, कर्करोग, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले (एचआयव्ही), रक्तदोष आदी अतिजोखमीचे आजार असलेले व त्याच्याशी निगडित इतर आजार असणारे रुग्ण, डायलेसिसवरील रुग्ण इत्यादी आजार व उपचारी सुरू असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही लस देण्यात येणार आहे. परंतु, अशा रुग्णांना आजाराबाबत उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
लसीकरण नोंदणीसाठी हेल्पलाइन
लसीकरण नोंदणी करण्यासाठी https://selfregistration.cowin.gov.in/ या लिंकचा वापर करावा.