पिंपरी-चिंचवडमधील घनकचऱ्यात वाढ; लोकप्रतिनिधी उदासीन!
![Increase in solid waste in Pimpri-Chinchwad; People's representative indifferent!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/पिंपरी-चिंचवडमधील-घनकचऱ्यात-वाढ-लोकप्रतिनिधी-उदासीन.jpg)
- पर्यावरण सध्यस्थिती अहवालामध्ये पितळ उघड
- अत्यावश्यक उपाययोजना करण्याबाबत होतेय दुर्लक्ष
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
‘स्वच्छ भारत’ अभियानाचा गाजावाजा करणारे पिंपरी-चिंचवड महापलिकेतील सत्ताधारी भाजपा किंवा ‘बेस्ट सिटी’ उभारल्याचा पाढा वाचणारा विरोधी पक्ष राष्ट्रवादीचे नगरसेवक- पदाधिकारी असोत सत्ताधारी आणि विरोधकांचाही बेजबाबदारपणा बुरखा फाडणारे चित्र समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका पर्यावरण विभागाकडून नुकतेच पर्यावरण सध्यस्थिती अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकावरील नगरसेवक- पदाधिकाऱ्यांचे ‘होश’ उडाले आहेत.
शहरात २०१६ – १७, २०१७-१८ आणि २०१८-१९ या तीन वर्षांचा तुलनात्मक अहवाल पाहता शहरात प्रतिदिन संकलीत होणाऱ्या घन कचऱ्यामध्ये प्रतिदिन १०० हून अधिक टनांची वाढ झाली आहे.
२०१६ – १७ मध्ये ८११.१ टन प्रतिदिन, २०१७-१८ मध्ये ८५० टन प्रतिदिन आणि २०१८ – १९ मध्ये ९१६.१६५ टन प्रतिदिन असा चढता आलेख आहे. तसेच, वैद्यकीय घनकचऱ्यामध्ये २०१७ – १८ मध्ये ४९६ टन, तर २०१८ – १९ मध्ये ५५९ टन वाढ झाल्याची नोंद आहे.
लोकप्रतिनिधींची अनास्था…
पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे शहरातील कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण केले जाते. त्यानुसार त्याचा पुनर्वापर किंवा त्यावर प्रक्रिया करून जैव वैद्यकीय व घातक कचऱ्याची शात्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी सामाजिक जागृती, राजकीय इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेने शहरातील घनकचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचे चित्र आहे.
वैद्यकीय कचरा सर्वात घातक…
वैद्यकीय घनकचऱ्यामध्ये रुग्णालयातून बाहेर पडणाऱ्या कचरा हा आरोग्यासाठी सर्वात घातक असतो. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट शात्रोक्त पद्धतीने लावणे गरजेचे असते. जैव वैद्यकीय कचरा पिवळ्या, लाल, पांढऱ्या पिशव्यांमध्ये गोळा करण्यात येतो. म्हणजेच ज्वलणभट्टीत जाणारा कचरा, रिसायकलिंग व डम्पिंगला जाणारा कचरा धारदार काचेचा कचरा असा यामध्ये समावेश असतो. असे असतानाही ठोस उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे दूरदृष्टी नाही का? असा प्रश्न पिंपरी-चिंचवडकरांना पडला आहे.