breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेच्या कार्यक्रमात माजी महापौरांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, माजी महापौरांची व्यथा

  • बैठकीत माजी महापौरांनी मांडल्या सूचना
  • महापौरांनी दिले अमलबजावणीचे आश्वासन

पिंपरी – शहरात कॅन्सर रुग्णांसाठी स्वतंत्र हॉस्पीटल बांधावे. त्यासाठी २ एकर जागा आरक्षित ठेवावी. माजी महापौरांसह एका प्रतिनिधीला कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सन्मापुर्वक बसण्यासाठी जागा ठेवावी. सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये महिलांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत. वाचनालय, स्पर्धा परिक्षा केंद्र महिलांसाठी लघु उद्योग तातडीने सुरू करावेत, अशा अनेक सूचना माजी महापौरांनी आज बुधवारी (दि. 26) बैठकीत केल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी महापौरांच्या अनुभवाचा तसेच  विकास कामांच्या बाबतीत त्यांच्या सुचना व मार्गदर्शन घेण्यासाठी माजी महापौरांची बैठक महापौर कार्यालयात महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी माजी महापौर ज्ञानेश्वर लांडगे, रंगनाथ फुगे, कविचंद भाट, आर. एस. कुमार, संजोग वाघेरे, अनिता फरांदे, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, नितीन काळजे तसेच अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, डॉ. अनिल रॉय उपस्थित होते. यावेळी माजी महापौरांच्या वतीने महापौर राहुल जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

बैठकीत माजी महापौर अनिता फरांदे म्हणाल्या, महापालिकेच्या वतीने शहरात कॅन्सर रुग्णांसाठी हॉस्पीटल बांधावे. त्यासाठी २ एकर जागा आरक्षित ठेवावी. यासाठी खाजगी संस्था तयार असल्यास त्यांच्या मार्फत हॉस्पीटल चालवावे. त्यावर आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉय म्हणाले, प्राधिकरणात कॅन्सर हॉस्पीटलसाठी जागा उपलब्ध करुन दिली होती. परंतू तेथे कोणतीही संस्था हॉस्पीटल चालू करण्यास पुढे आली नाही. खाजगीपेक्षा महापालिकेत पगार कमी असल्याने डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. चिखली येथे मोठे हॉस्पीटल बांधण्यात येईल. तेथे १०० बेडचे आरक्षण कॅन्सर रुग्णांसाठी ठेवण्यात येईल.

कविचंद भाट म्हणाले, मनपाच्या कार्यक्रमांना माजी महापौरांना निमंत्रित करावे. माजी महापौरांचा एका प्रतिनिधीला स्टेजवर बसण्यास जागा ठेवावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी पहिल्या रांगेत माजी महापौरांसाठी जागा राखीव ठेवावी. माजी महापौरांची संघटना तयार करावी. त्यांच्यासाठी महापालिकेत केबीन देण्यात यावे. माजी महापौरांची दोन महिन्यांनी मिटींग घ्यावी. माजी महापौरांच्या निवास स्थानाचे बोर्ड लावावेत.

वैशाली घोडेकर म्हणाल्या, माजी महापौर संघटनेचे ज्येष्ठ महापौरांना अध्यक्ष करावे. महापालिका सभेत माजी महापौरांनी हाथ वर केल्यास बोलण्याची संधी द्यावी. ज्येष्ठ नागरिक महासंघास कार्यालयासाठी, कार्यक्रमासाठी महापालिकेची जागा देण्यात यावा. अपर्णा डोके म्हाणाल्या, सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये महिलांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत. तेथे वाचनालय, स्पर्धा परिक्षा केंद्र महिलांसाठी लघु उद्योग तातडीने सुरू करावेत. शहरात सध्या डेंग्यू, स्वाईन फ्ल्यूची साथ आहे. त्यावर तातडीने उपाय योजना कराव्यात. आर. एस. कुमार म्हणाले, प्रथम महापौरांचे अभिनंदन. शहरास सध्याचा पाणी पुरवठा अपूरा आहे. भामा आसखेड- आंद्रा प्रकल्पाचे पाणी शहरात लवकरात लवकर आणावे. पवना बंद जलवाहिनीचे काम पूर्ण करावे.

ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले की, शहरात जनावरांसाठी दवाखाने चालू करावेत. रंगनाथ फुगे म्हणाले की, निगडीपर्यंत मेट्रो करावी. शहरातील मेट्रोला पिंपरी-चिंचवड मेट्रो नाव देण्यात यावे. माजी महापौरांसाठी वैद्यकीय विमा चालू करावा. मेट्रोशेजारी बीआरटी आहे. त्यामधून खाजगी वाहने जातात. त्याला प्रतिबंध करावा. माजी महापौरांना निमंत्रण पत्रिका देण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमावा. माजी महापौरांना दरवर्षी पाच डाय-या देण्यात याव्यात.

राहुल जाधव म्हणाले, सर्व माजी महापौरांनी केलेल्या सुचनेवर अंमलबजावणी केली जाईल. सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button