पालिकेचे अपयश; गृहरचना संस्थांमधील सांडपाणी शुध्दीकरण प्रक्रिया “फेल”
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Ab.jpg)
पिंपरी – महापालिकेच्या हद्दीतील सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी मैलाशुध्दीकरण केंद्रांद्वारे पाणी शुध्द केले जाते. सुमारे 338 द.ल.लि. सांडपाण्यावर दैनंदीन प्रक्रिया करण्याची क्षमता असलेली 13 मैलाशुध्दीकरण केंद्रे कार्यरत आहेत. सुमारे 260 द.ल.लि. घरगुती सांडपाण्यावर दररोज प्रक्रिया केली जाते. मात्र, बहुतांश गृह संस्थांचे सांडपाणी शुध्दीकरण प्रक्रियेविना नदीपात्रात सोडले जाते. हे रोखण्यात पालिकेला अपयश आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मैलाशुध्दीकरण केंद्रे बांधली आहेत. दररोज शहराला सुमारे 470 द.ल.लि इतका पाणी पुरवठा होत असताना त्यातील सुमारे 260 द.ल.लि. घरगुती सांडपाण्याचे दररोज शुध्दीकरण केले जाते. कासारवाडी टप्पा 1 व 2 मधील प्रक्रिया केलेले 5 दशलक्ष लिटर्स पाण्याचा मिलिटरी डेअरी फार्म येथील शेतीच्या सिंचनासाठी एप्रिल 2016 पासून पुरवठा केला जात आहे. कासारवाडी टप्पा 3 मधील प्रक्रिया केलेले 10 द.ल.लि. लिटर्स पाणी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींग सीएमई येथे रोवींग चॅनेलसाठी पुरवठा केले जाते.
पालिका क्षेत्रात इमारतींमध्ये निर्माण होणारे सांडपाणी पुनर्चक्रीकरण व पुनर्वापरात आणले जाते. प्रायोगित तत्वावर प्रथमतः वायसीएम हॉस्पीटल येथे 0.65 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पॅकेज प्लॅन्ट उभारण्याचे काम नुकतेच झाले आहे. हा प्लांट यशस्वीपणे सुरू आहे. चिखली टप्पा 1 व 2 मधील प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी काही पाणी, संभाजीनगर वॉर्ड नंबर 9 मधील मनपाच्या उद्यानासाठी पुरविण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, उद्यानासाठी या पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. मात्र, गृहरचना संस्थांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात पालिकेचे अधिकारी अपयशी ठरले आहेत. काही मोजक्याच सोसायट्या सोडल्या तर बहुतांश सोसोयट्यांमध्ये सांडपाणी शुध्दीकरण प्रक्रिया यंत्रणा उभी केलेली नाही.
औद्योगिक क्षेत्रासाठी शुध्द पाणी पुरवठा
शहरातील नागरिकांना पुरवठा केलेल्या पाण्यापैकी सांडपाण्यावर एकत्रीत शुध्दीकरण प्रक्रिया केली जाणार आहे. ते पाणी पिण्याव्यतिरिक्त म्हणजे उद्यान, रस्त्यांच्या दुभाजकांमधील गार्डन यासाठी वापरले जाणार आहे. त्यासाठीचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. त्याअंतर्गत शहरातील व लगतच्या औद्योगिक कंपन्या व कारखान्यांना देखील शुध्द पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे.