पालिका शाळांमध्ये साजरा होणार कारगील विजय दिवस; शिक्षण समिती सभापतींचा निर्णय
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये येत्या २६ जुलै रोजी कारगील विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. महापालिकेच्या शिक्षण समितीच्या पहिल्याच बैठकीत गुरुवारी (दि.१९) हा निर्णय घेण्यात आला.
समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. महपालिकेच्या मराठी, हिंदी, ऊर्दू, इंग्रजी सर्व माध्यमांच्या प्राथमिक १०५ व माध्यमिक १८ शाळा आहेत. शाळांमध्ये कारगील युध्दातील विजयाचे व युध्दामध्ये शहीद जवानांना स्मरून विद्यार्थ्यांना त्याची जाणीव होणे गरजेचे आहे. त्यांच्यात देशाभिमान जागृत करण्यासाठी दरवर्षी २६ जुलै रोजी कारगील विजय दिवस साजरा करण्यात यावा, असा ठराव समितीने मंजूर केला. कारगील विजय दिवस साजरा करताना शिक्षक व मुख्यध्यापकांनी विद्यार्थ्यांना त्याची माहिती द्यावी. तसेच, सर्व शाळांमध्ये हा दिवस साजरा करण्याबाबत सूचना देण्याचे निर्देश सोनाली गव्हाणे यांनी दिले.