पार्थ अविवाहित आहे, त्याला निवडून द्या, लोकांचे प्रश्न मांडेल : अजित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/IMG_20190413_163954.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभा मतदारसंघात मुलगा पार्थ पवारच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मावळमध्ये तळ ठोकून आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आकुर्डी येथे अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना अजित पवारांनी मुलगा पार्थला निवडून देण्याचं आवाहन केलं.
पार्थ पवार अविवाहित आहे. त्याला निवडून द्या, बॅचलर लोकही लोकसभेत गेले पाहिजेत, असा विनोद अजित पवारांनी केला. त्यांचेही काही प्रश्न असतील ते पार्थ पवार सोडतील, असं म्हणत त्यांनी पार्थला निवडून देण्याचं आवाहन केलं. उद्घाटन प्रसंगी त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींसह मावळचे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यावरही टीका केली. स्मृती इराणी बारावी पास, हे दहावी पास, असा टोला लगावत ते कशा पद्धतीने प्रश्न मांडतील असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी उद्घाटनप्रसंगी केला.
राज्यात शेवटच्या टप्प्यात मावळ मतदारसंघासाठी 29 एप्रिलला मतदान होणार आहे. मावळमध्ये अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुलासाठी ते सध्या पिंपरी चिंचवडमध्ये तळ ठोकून आहेत. मावळमध्ये रायगड जिल्ह्यातीलही तीन विधानसभा मतदारसंघ येतात. उरण, कर्जत आणि पनवेलमध्येही अजित पवार स्थानिक नेत्यांची मदत घेण्याच्या प्रयत्नात आहेत.