पाण्यासाठी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांचे पालिकेसमोर बेमुदत उपोषण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/IMG-20190923-WA0010.jpg)
- पिंपरी, महाईन्यूज, प्रतिनिधी
पाऊस मुबलक झाला असला तरी पिंपळे निलख, वाकड भागातील नागरिकांना गेली कित्येक दिवस पुरेसे पाणी मिळत नाही. महापालिका प्रशासन ही बाब गांभिर्याने घेत नसल्यामुळे या भागाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गेटसमोर आजपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. भाजपची सत्ता असताना नागरिकांच्या समस्येवरून भाजप नगरसेवकांना स्वपक्षाच्या विरोधात उपोषण करावे लागत असल्याने भाजपला ही चपराक मानली जात आहे.
हिंजवडी आयटी पार्क आणि पिंपळे निलख आणि वाकड भागांमध्ये अल्पांतर असल्यामुळे आयटीचा कामगार वर्ग या भागात स्थिरावला आहे. सोसायट्यांचे प्रमाण मोठे असल्याने नागरिकांनी महापालिकेकडून मिळणा-या सुविधांपोटी टॅक्सही वेळेत भरला आहे. तरी, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून त्यांना मुबलक पाणी दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत.
नागरिकांना वेळेत स्वच्छ पाणी देण्याची मागणी नगरसेवक कामठे यांनी अनेकदा केली. तरीही, पालिका प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे उघडकीस आहे. शेवटी कामठे यांनी प्रशासनाच्या विरोधात पालिकेच्या समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. तरी देखील या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या मनस्थितीत प्रशासन दिसत नव्हते. शेवटी कामठे यांनी आज उपोषणाला सुरूवात केली आहे. कामठे यांच्यासोबत पिंपळे निलख भागातील काही समाजसेवक आणि सतर्क नागरिकही सहभागी झाले आहेत.