breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाणी प्रश्नावर सत्ताधारी – विरोधकाचं ठरलं, …कसं आयुक्त म्हणतील तसं !

विरोधकांचा महासभेत शाब्दिंक हल्ला, सर्वपक्षीय बैठकीत मूकसमंती, सत्ताधा-यांकडून आयुक्तांचे समर्थन

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णयावरुन आज (बुधवारी) महासभेत विरोधकांनी शांततेच्या मार्गाने प्रशासनावर शाब्दिक हल्ला चढविला. मात्र, सर्वपक्षीय झालेल्या बैठकीत आयुक्तांचा निर्णय रद्द करण्यास भाग पाडण्याऐवजी मूकसमंतीच दिली होती. त्यामुळे पाणी प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीत एक आणि महासभेत अशी डबल ढोलकी वाजत होते का? असा सवाल उपस्थित होत आहे. पाण्यावर महासभेत सत्ताधारी – विरोधक असलेले नगरसेवक आवाज उठवून आम्ही जनतेचे सेवक असल्याचे दाखवित होते. परंतू, महापालिकेचे सत्ताधारी-विरोधक बेजबाबदारपणे वागत असून प्रशासनाने लादलेला निर्णयावर महासभेत शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावर सत्ताधारी – विरोधकाचे ठरलं असून …. कसं आयुक्त म्हणतील तसं, असाच कारभार सुरु झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची तहकूब आणि नोव्हेंबर महिन्याची नियमित महासभा आज (बुधवारी) झाली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिका प्रशासनाने सोमवारपासून एक दिवसाआड पाणीकपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर महासभेत चार तास चर्चा झाली. 24 नगरसेवकांनी या चर्चेत सहभाग घेतला.

नगरसेवक दत्ता साने यांनी आयुक्तांच्या निष्क्रिय कारभारामुळे हिवाळ्यातच दिवसाआड पाण्याचे संकट ओढावले आहे. खासगी टँकर लॉबीला पोसण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. नगरसेविका मिनल यादव म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षात पाणी कपात नव्हती. आताच पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. आयुक्तांनी दबावाखाली चुकीची कामे करु नयेत, असा आरोप केला.

नगरसेवक अंबरनाथ कांबळे म्हणाले की, शहरातील चोवीस तास पाणी योजनेचे कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. अधिकारी नगरसेवकांना वेड्यात काढत आहेत. राष्ट्रवादीच्या अपर्णा डोके पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. भाजपचे संदीप कस्पटे म्हणाले, दिवसाआड पाणी करण्याचा फेरविचार करावा.

शिवसेनेचे सचिन भोसले म्हणाले, सुरळीत पाणी मिळत नसेल तर नागरिकांनी पाणीपट्टी भरु नये. संदीप वाघेरे म्हणाले, भाजपची सत्ता आल्यापासून पाण्याची बोंब सुरु झाली आहे. अधिका-यांनी भाजपची सुपारी घेतली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादीच्या मंगला कदम म्हणाल्या, पाणी गळती, पम्पिंग या विषयी वर्षानुवर्षे अधिकारी तीच रडगाणे गात आहेत. गेल्या 15 वर्षांत अनेक उपाययोजना, प्रकल्प आणले गेले. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने आज पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आगामी काळात पाणी प्रश्नच शहराची राजकीय दिशा ठरवेल असे सीमा सावळे म्हणाल्या.

पाणी कपातीला प्रशासन जबाबदार, असे भाजपचे शत्रुघ्न काटे म्हणाले. आशा शेंडगे, अश्विनी चिंचवडे, नीता पाडाळे, संगीता ताम्हाणे, नितीन काळजे, झामाबाई बारणे, संतोष लोंढे, जावेद शेख यांनी चर्चेत सहभाग घेवून दिवसाआड पाण्याला विरोध दर्शविला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button