पंतप्रधान नरेंद्र मोदींची १७ ऑक्टोबरला पुण्यात ‘प्रचारसभा’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/modi-60046_201910309292.jpg)
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील प्रचारसभेसाठी शहर भाजपाला १७ ऑक्टोबर (गुरुवार) ही तारीख मिळाली आहे. संपूर्ण पुणे शहरासाठी ते एकच सभा घेणार आहेत. यासाठी सोयीचे स्थळ निश्चित करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपची संघटनात्मक स्तरावर असलेली बूथ यंत्रणा कार्यान्वित झाली असून ‘घरोघरी संपर्क’ हे सूत्र त्यांना दिले आहे.
शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी सांगितले, की पक्षाच्या केंद्रीय शाखेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ ऑक्टोबरला सभेसाठी येतील, असे कळवले आहे. ते सातारा येथेही त्याच दिवशी सभा घेणार आहेत. त्यामुळे वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. पुण्यात त्यांची एकच सभा होणार आहे. शहरातील सर्वच मतदारसंघांना सोयीचे होईल, असे ठिकाण त्यासाठी निश्चित करण्यात येत आहे. शहरातील शैक्षणिक संस्थांनी त्यांची मैदाने प्रचारासाठी उपलब्ध करून देणे बंद केले आहे. त्यामुळे मोठ्या मैदानांची कमतरता जाणवत आहे; मात्र त्यावर मार्ग काढण्यात येईल. पंतप्रधानांशिवाय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह व अन्य काही मंत्र्यांच्या सभांचीही मागणी शहर शाखेने केंद्राकडे केली आहे. त्यांच्याही सभा प्रचारकाळात होतील, अशी माहिती मिसाळ यांनी दिली.