“निसर्ग कोपला” : पुण्यातील चक्री वादळाचा मावळ, मुळशी तालुक्याला फटका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/IMG-20200603-WA0015.jpg)
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता निसर्ग चक्री वादळाने महाराष्ट्राची कोकण किनामरपट्टी बरोबरच पुणे, मुंबईतही मोठे नुकसान केले आहे. चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्यातील मावळ आणि मुळशी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. वादळामुळं हवेली तालुक्यात एकाचा तर खेड तालुक्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुण्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, हवेली, पुरंदर, शिरूर, दौंड या ठिकाणी अजूनही मध्यम स्वरूपाचा वारा व पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी शाळांचे पत्रे, घराचे छप्पर, झाड कोसळणे, विजेचे खांब पडणे आदी प्रकारचे नुकसान दिसून आले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून जनजीवन सुरळीत करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
पुण्यात अनेक ठिकाणी झाडं कोसळली
निसर्ग चक्रीवादळामुळं परिस्थितीमुळे पुणे शहराच्या विविध भागात काल रात्रीपासून आज सायंकाळी पाच पर्यंत झाड पडण्याच्या 60 च्या आसपास घटना तर 9 ठिकाणी पाणी साठल्याच्या अग्निशमन दलाकडे नोंदी आल्या आहेत. पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांकडून घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. पुण्यामध्ये रात्री बारा वाजल्यापासून ते आतापर्यंत झाडे पडण्याच्या संदर्भातले जवळपास 40 फोन काॅल आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग विस्कळीत
अलिबाग-उरण मार्गे भूगर्भावर प्रवेश केलेल्या चक्रीवादळाने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला ही लक्ष केलं. पुण्याला जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी झाडं कोसळल्याचं चित्र दिसून आलं. ती झाडं रस्त्यावरून हटवण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. अनेक ठिकाणी मार्गावर कोसळलेले वृक्ष कर्मचाऱ्यांनी हटवले आहेत.
विधानभवन परिसरात झाडं उन्मळून रस्त्यावर
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानं विधानभवन परिसरात झाडं उन्मळून रस्त्यावर आलं. तर मुंबईतील काळाचौकी परिसरात झाड उन्मळून पडलं, यात चारचाकी गाड्यांचं नुकसान झालं आहे. मुंबईतील कुर्ला परिसरातील कानगार नगर वसाहतीत एक विशाल पिंपळाचं झाड बुधवारी दुपारी उन्मळून पडलं. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबईला निसर्ग या चक्रीवादळानं थेट तडाखा दिला नसला जीवितहानी झाली नसली तरी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठिकठिकाणी उन्मळून पडलेल्या वृक्षांमुळे मुंबईला त्याची झळ मात्र नक्कीच बसली. निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईसाठी पुढील दोन दिवस धोक्याचे असतील असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. दोन दिवस लोकांनी बाहेर पडू नये, त्यातल्या त्यात समुद्रकिनारी तर आजिबात येऊ नये, असं महापौरांनी म्हटलं आहे.