निगडी-दापोडी बीआरटीचे शुक्रवारी उद्घाटन ; बीआरटीला मेट्रोचा अडथळा कायम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/saasaa_201807105741.jpg)
आयुक्त श्रावण हर्डीकरांची माहिती
पिंपरी – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी-दापोडी या बीआरटीएस मार्गावर बससेवा सुरू करण्यास उच्च न्यायलयाने हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे याच आठवड्यात या मार्गावर बीआरटीएस बससेवा सुरू करणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी येत्या शुक्रवारी (दि.२४) निगडीतील बीआरटी टर्मिनलचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, बीआरटी मार्गावर मेट्रोचे काम सुरु असल्याने अनेक ठिकाणी अडथळा निर्माण होणार आहे.
दापोडीपासून निगडीपर्यंत एकूण १२.५० किमी अंतराच्या बीआरटी मार्गाच्या विरोधात सुरक्षेच्या मुद्यावरून हिम्मतराव जाधव यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर दोन वेळा बसचाचणी घेतल्यानंतर अखेर याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यामुळे निगडी-दापोडी बीआरटी मार्गाचा तिढा सुटला. त्यानंतर तातडीने बीआरटी सुरू करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. पालिकेकडून आवश्यक कामे पूर्ण केली जात आहेत.
दरम्यान, या बीआरटी मार्गाबाबत आयुक्त हर्डीकर म्हणाले की, न्यायालयाने तातडीने बीआरटी सुरू करण्यास सांगितले आहे. आधीच उशीर झाला असल्याने बीआरटी सुरू करणे क्रमप्राप्त आहे. आपण टर्मिनलचे उद्घाटन करणार आहोत. त्या पाठोपाठ या मार्गावर बीआरटी बससेवा सुरू होईल. मेट्रोच्या कामाचा किंवा इतर कुठलाही अडथळा ठरणार नाही. नियोजन करून या मार्गावर बीआरटी बससेवा चालू केली जाईल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.