breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नगरसेवक मारहाण प्रकरण : विलास मडिगेरी यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया; पोलिसांकडून मारेकऱ्यांना ‘अभय’?

पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृह नेते नामदेव ढाके यांचा आक्षेप

शिवसेना- राष्ट्रवादीकडून दबाव; पोलिसांच्या कारवाईकडे भाजपाचे लक्ष

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपा नगरसेवक विलास मडिगेरी यांना मारहाण प्रकरण शिवसेना-राष्ट्रवादीच्या अंगलट येणार आहे. मडिगेरी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया (एंजिओप्लास्टी) करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या प्रकरणात ‘भाजपा बनाव’ करीत असल्याचा कांगावा खोटा ठरला आहे, असा दावा सत्तारुढ भाजपाचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना १ जून रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेत बेदम मारहाण झाली. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे आणि पंकज भालेकर या तिघांनी मडिगेरी यांना लाथाबुक्क्यांनी ही मारहाण केली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत मडिगेरी हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी सत्ताधारी भाजपाची मागणी आहे.

मात्र, राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या राजकीय दबावामुळे पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून मडिगेरी यांना मारहाण करणाऱ्यांना ‘अभय’ दिले जात आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. कायदा जर सर्वांना समान असेल, तर पोलिसांनी नगरसेवकांबाबतही तो त्याच पद्धतीने अंमलबजावणी केली पाहिजे. पण पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून तसे झालेले नाही, असे भूमिका नामदेव ढाके यांनी ‘महाईन्यूज’ शी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान, मारहाण झाली त्या दिवशीच मडेगिरी यांना छात्तीवर मार लागल्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होत होता.  बेदम मारहाण केली असतानाही संबंधित नगरसेवक किरकोळ धक्काबुक्की झाली, असे म्हणत आहेत. तसेच, भाजपा ‘डाव’ करीत आहे, असे संबंधितांचे म्हणणे आहे. पण, डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे संबंधित गुंड प्रवृत्तीचे नगरसेवक अडचणीत येणार आहेत, असेही नामदेव ढाके यांनी म्हटले आहे.

भाजपा कोअर कमिटीची उद्या बैठक…

दरम्यान, भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी ‘नगरसेवक मारहाण’ प्रकरणातील तीनही नगरसेवकांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मात्र, अद्याप पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल असून, ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे उद्या (दि.८ जून) भाजपा कोअर कमिटीची बैठक घेण्यात येणार असून, प्रसंगी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल, असेही सभागृह नेते ढाके यांनी म्हटले आहे.

स्थानिक- बाहेरचा असा वाद नकोच : नगरसेवक संदीप कस्पटे

मडिगेरी मारहाण प्रकरणातील ‘कलाटे बंधू’वर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाला स्थानिक- बाहेरचा अशी किनार देण्याचा काही लोक प्रयत्न करीत आहेत. मडिगेरी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. महापालिका भवनात लोकप्रतिनिधीला मारहाणीची घटना निषेधार्हच आहे. अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. या शहरात राहणारा प्रत्येक नागरिक पिंपरी-चिंचवडकर आहे. त्यामुळे असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नगरसेवक संदीप कस्पटे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button