नऊ महिने ते पंधरा वर्षाच्या मुलांसाठी पालिकेची रुबेला लसीकरण मोहीम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/download-10.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – संपूर्ण राज्यात गोवर रुबेला (MR) लसीकरण मोहिम २७ नोव्हेंबरपासून राबविण्यात येत आहे. ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालके, विद्यार्थ्यांना ही लस देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त बालक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून मोहिमेचा उद्देश साध्य केला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे.
मोहिमेची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात करणेत येणार आहे. सदरचे लसीकरण महापालिकेच्या वैद्यकिय विभागाकडून मनपा शाळा, खाजगी शाळा, अंगणवाडी, बालवाडी, नर्सरी याठिकाणी करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रचार व प्रसिध्दीकामी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी काम करणार आहे. ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील मुलांना लसीकरण करुन घ्यावे, असे मार्गदर्शनही केले जाणार आहे. मोहिमेचा प्रचार करण्यासाठी गुरूवारी पालिका भवनासमोर सभा घेण्यात आली.
सभेला अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलिप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ. छाया शिंदे, पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे, महासचिव चारुशिला जोशी, मनोज माछरे, नितीन समगीर आदी उपस्थीत होते.
गोवर लसीकरण हा एक सुरक्षित, प्रभावी आणि स्वस्त उपाय उपलब्ध असताना देखील गोवर हे लहान मुलांमध्ये मृत्युचे प्रमुख कारण आहे. रुबेला हा सांसर्गिक, प्रामुख्याने सौम्य प्रकाराचा व्हायरल आजार आहे, जो मुलांमध्ये व प्रामुख्याने तरुण मुलींमध्ये आढळून येतो. रुबेलाच्या संसर्गामुळे गरोदर स्त्रीयांमध्ये गर्भाचा मृत्यु किंवा अर्भकास जन्मजात विकृती (आंधळेपणा, बहिरेपणा किंवा हृदयाचे विकार) असे आजार उदभवू शकतात. यास कंजनायटल रुबेला सिंड्रोम (CRS) असे म्हणातात.
जगभरात वर्षाला १ लाख बालकांमध्ये जन्मजात CRS आजार आढळून येतो. या आजाराकरिता विशिष्ठ उपचार पध्दती उपलब्ध नसुन फक्त रुबेला लसीकरणाव्दारे याला रोखु शकता येते याकामी सदर मोहिम २७ नोव्हेंबरपासून पुढील महिनाभर राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज माछरे यांनी केले. आभार चारुशिला जोशी यांनी मानले.