‘धन्वंतरी’ योजनेची साडेदहा कोटीची दीड हजार बिले प्रलंबित
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचा-यासह सेवानिवृत्तांना धन्वंतरी योजना लागू आहे. या योजनेला तरतूद नसणे, संबंधित अधिका-यांने बिलांवर सह्या न करणे आणि बिलांची तपासणी न केल्याने मागील वर्षभरापासून सुमारे साडेदहा कोटीची बिले तब्बल दीड हजार बिले प्रलंबित आहेत. त्यामुळे धन्वंतरी योजनेतून नव्याने दाखल होणा-या रुग्णांवर उपचारास टाळाटाळ होवू लागली आहे.
महापालिकेने धन्वंतरी स्वास्थ योजनेवर मागील चार वर्षांत सुमारे 60 कोटी 91 लाख रुपये खर्च केला आहे. ही आरोग्य योजना महागडी ठरु लागल्याने फेब्रुवारी 2019 मध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला आरोग्य वीमा योजना लागू करण्यात आली. परंतू, त्याला कर्मचारी महासंघाने तीव्र विरोध दर्शविला. त्यावर तात्पुरती स्थगिती उठवून धन्वंतरी योजना लागू केली. मात्र, विमा योजना लागू करु नये, यावर न्यायालयात कर्मचारी महासंघाने दावा दाखल करुन दाद मागितली. त्यावर 25 नोव्हेंबरला सूनावणी होणार आहे. त्यामुळे धन्वंतरी की विमा योजना लागू करण्यावर निर्णय अपेक्षित आहे.
महापालिकेने अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले सादर करण्याची परवानगी देण्यात आली होती. या नवीन वैद्यकीय धोरणांतर्गत 1 सप्टेंबर 2015 पासून महापालिका कर्मचाऱ्यांना धन्वंतरी स्वास्थ योजना लागू करण्यात आली. महापालिका सेवेतील सुमारे साडे सात हजार कर्मचारी तसेच या योजनेत महापालिका सेवेतील शिक्षकांना देखील सामावून घेण्यात आले. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचारी यांनादेखील ही योजना ऐच्छिक पद्धतीने लागू करण्यात आली.
या योजनेअंतर्गत महापालिका सेवेतील कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनातून 300 रुपयांची कपात केली जात होती. तर सेवानिवृत्त कर्मचारी अथवा अधिकाऱ्याच्या वेतनातून दरमहा 150 रुपये कपात केली जात होती. या योजनेचा लाभ कर्मचारी व त्याची पत्नी अथवा पती यांच्याबरोबरच 18 वर्षाखालील दोन पाल्यांना घेता येत असे. मात्र या योजनेवर अधिक खर्च होत असल्याचे कारण देत वैद्यकीय विभागाने ती योजना बंद करून खासगी कंपनीकडून विमा योजना लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला.
फेब्रवारी महिन्यात झालेल्या सभेत त्याला मंजुरी देण्यात आली. नवीन योजनेसाठी 2019-20 या अर्थिक वर्षात 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र धन्वंतरी योजनेतील प्रलंबित बिले अदा करण्यासाठी तरतूद कमी पडत असल्याने वैद्यकीय विमा योजनेच्या 15 कोटीमधील 6 कोटी रुपयांचा निधी धन्वंतरी योजनेसाठी वर्ग करण्यात आला. त्यामुळे विमा योजनेसाठी 9 कोटींचा निधी शिल्लक होता.
दरम्यान, महापालिकेच्या धन्वंतरी योजनेसाठी पॅनेलवर 93 खासगी रुग्णालये आहेत. त्या रुग्णालयात उपचार केलेली सुमारे दहा कोटी 59 लाख 74 हजार 640 रुपयांची एक हजार 673 बिले अद्याप प्रलंबित आहेत. मागील सहा महिन्यापासून अकराशे बिले केवळ संबंधित वरिष्ठ अधिका-यांच्या सह्या न केल्याने आणि नऊशे बिले ही तपासणी न केल्याने प्रलंबित राहिली आहेत.