दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार – खासदार श्रीरंग बारणे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/215.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – उरण, पनवेल, कर्जतमध्ये राष्ट्रवादीची ताकद कमी आहे. गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर मी यावेळी दोन लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार आहे. हा आत्मविश्वास उराशी आहे. त्यासाठी कोणत्या जोतिषाकडून भविष्य बघण्याची गरज नाही, असा विश्वास मावळ लोकसभेचे शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.
मोरवाडीत आज पत्रकार परिषदेत घेऊन बारणे यांनी ही माहिती दिली. आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, नगरसेवक व पिंपरी विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, नगरसेवक सचिन भोसले, पिंपरी विधानसभा संघटिका सरिता साने, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, किरण मोटे, अनंत को-हाळे, ज्ञानदेव शिंदे, नितीन घोलप आदी उपस्थित होते.
बारणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी देशातील जनता सज्ज आहे. मावळ मतदारसंघात तब्बल अडीच लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये युवकांची संख्या जास्त आहे. या नव मतदारामध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी उत्साह आहे, असेही बारणे म्हणाले.
गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासकामे केली आहेत. पाच वर्षात मी जनतेशी जोडलो गेलो आहे. त्यामुळे मतदारांच्या आशीर्वादाने दोन लाख मताच्या फरकाने मी निवडून येईन, असा विश्वास असल्याचे बारणे म्हणाले. तसेच, आपण कोणावर वैयक्तिक टीका करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.