दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ, पतीसह सासरच्या सहाजणांवर गुन्हा
पिंपरी / महाईन्यूज
फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात शनिवारी (दि. 28) चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल आहे.
पती निलेश बद्दूसिंग चव्हाण, सासू बेबीबाई बद्दूसिंग चव्हाण, मोठा दीर नवल बद्दूसिंग चव्हाण, लहान नणंद रेखा राठोड (चौघे रा. माहुली, पो. भुली, ता. मानोरा, जि. वाशीम), मोठी नणंद सुषमा राठोड, नंदावा संतोष राठोड (रा. नागपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता आणि आरोपी निलेश यांचा ८ जून २०१७ रोजी विवाह झाला. विवाह झाल्यापासून आरोपींनी विवाहितेकडे नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. तसेच, विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार तिला शिवीगाळ करत मारहाण केली. यातून आरोपींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.