थेरगावातील इसमाची ९१ हजारांची फसवणूक
पिंपरी ( महा ई न्यूज ) – मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून पॉलिसीची रक्कम त्याच्या बँक खात्यात भरण्यास सांगून ती रक्कम बँकेत न भरता एकाची ९१ हजार ६३१ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना गणेशनगर थेरगाव येथे घडली.
माल्याद्री मालाकोंडाय्या पल्लाला (वय ४५, रा. गणेशनगर, थेरगाव) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मनीषकुमार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या नावाच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माल्याद्री यांची मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये पॉलिसी आहे. बुधवारी (दि.२८ नोव्हेंबर) रोजी आरोपी मनीषकुमार याने फिर्यादी यांना फोन केला. तसेच आपण मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून, पॉलिसीची रक्कम जर २३ डिसेंबर पूर्वी भरली तर त्यांना ठराविक रकमेची सूट मिळणार आहे, असे सांगितले. यावर फिर्यादी यांनी आरोपीने पाठवलेल्या बँक खात्यामध्ये ९१ हजार ६३१ रुपये भरले. मात्र आरोपीने ते पैसे पॉलिसीसाठी न भरता त्याचा अपहार केला. यावरून त्याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.