breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

तोतया माथाडी खंडणीखोरांना जेरबंद न केल्यास‘जेल भरो’ – बाबा आढाव

  • पोलिस आयुक्त कार्यालयावर हमाल पंचायत व मित्र संघटनांचा मोर्चा

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  कधीही पाठीला पोते न लावलेले गुंड, राजकीय वरदहस्त असलेले कथित कार्यकर्ते बोगस माथाडी संघटना स्थापन करून उद्योजक, व्यापारी, खर्‍या हमालांना धमकावत खंडणी वसूल करतात. काम न करता हमालीचे अवाच्या सव्वा पैसे उकळतात. त्यामुळे खरे माथाडी-हमाल व माथाडी कायदा बदनाम होत आहे. पोलिसांनी त्यांना जेरबंद करावे अन्यथा माथाडी मंडळातील नोंदणीकृत हमाल सत्याग्रह करून जेल भरो करतील, असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यानी दिला.

हमाल पंचायत व मित्र संघटनांच्या वतीने पिंपरी पोलिस आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. मोर्चाचे नेतृत्व डॉ. आढाव, नितीन पवार, मानव कांबळे यांनी केले. भर पावसात निघालेल्या या मोर्चात शेकडो हमाल, रिक्षाचालक, पथारी व्यावसायिक सहभागी झाले होते. रिक्षा पंचायत, क्रांती कष्टकरी पथारी महासंघ, नागरी हक्क सुरक्षा समिती, पथारी व्यावसायिक पंचायत, अंगणवाडी कर्मचारी सभा आदी संघटना यात सहभागी होत्या.

माथाडी कायद्याचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने डॉ. आढाव यांनी पिंपरी माथाडी मंडळाचे सचिव मुकम्मील मुजावर यांच्या हातात मंडळाच्या नामफलकाला घालण्यासाठी पुष्पहार दिला. चिंचवड रेल्वे मालधक्क्याजवळून मोर्चाला सुरुवात झाली. तेथून तो एस.के.एफ. कॉलनीमार्गे प्रेमलोक पार्क येथील आयुक्तालयावर पोहचला. ‘बोगस माथाडींवर कारवाई करा, तोतया माथाडी खंडणीखोरांना जेरबंद करा, कष्टकर्‍याना संरक्षण द्या, बेकायदा वाहतुकीवर कारवाई करा’ आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.

आयुक्तालयावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. त्यावेळी नितीन पवार म्हणाले, माथाडी कायदा न पोहचलेल्या, परिणामकारकपणे अंमलबजावणी न होणार्‍या ग्रामीण भागात अजूनही लाखो कष्टकरी त्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. शासनाचा 1 रुपयाही खर्च न करता हमालीचे मासिक वेतन, प्रॉव्हीडंट फंड, विमा, वैद्यकीय योजना, गॅ्रच्युईटी, बोनस आदी विविध लाभ हमालांना मिळतात. हे कसे घडू शकते हे पहायला विदेशातूनही अभ्यासक पुण्यात येतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बोगस माथाडींचे या कायद्याला ग्रहण लागले आहे. माथाडीच्या नावाने गुन्हेगारांची खंडणीखोरी सुरू झाली आहे. गुन्हेगारीच्या या नव्या प्रकाराचा बिमोड पोलिसांनी करावा.

यावेळी मानव कांबळे, शैलजा चौधरी, गोरख मेंगडे, काशिनाथ शेलार, संतोष नांगरे आदींची भाषणे झाली. पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त पद्मनाभन यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

यावेळी पद्मनाभन म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रातील गुंडगिरी खंडणीखोरी मोडण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत झाले असून त्यांच्याकडे या विषयी माहिती, तक्रारी दाखल होताच तत्काळ कारवाई केली जाईल. पोलिस अधिकार्‍यांसाठी लवकरच माथाडी कायद्याविषयी कार्यशाळा घेतली जाईल. या शिष्टमंडळात आशा शिंदे, चंदनकुमार, महादेव तिपाले, अशोक मिरगे, काशिनाथ नखाते, हनुमंत बहिरट यांचा समावेश होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button