तहसीलदाराच्या पतीकडून राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराच्या जीवाला धोका?
![Few NCP leaders meet in Delhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/ncp_logo759.jpg)
पुणे । प्रतिनिधी
खेडच्या तहसीलदार सुचित्रा बाळासाहेब आमले यांची बदली होणार आहे. परंतु, सदरची बदली होऊ नये यासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची तहसीलदार समर्थक सोशल मीडियाच्या माध्यमातून तसंच इतर विविध माध्यमांतून बदनामी सुरू केली आहे. तसंच तहसीलदार यांचे पती गुंड प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्यापासून जीविताला धोका असल्याचा आरोप दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे.
तहसीलदार यांच्या बदलीवरून खेड तालुक्यात आमदार विरुद्ध तहसिलदार यांची लढाई आता विकोपाला गेला आहे. ‘तहसीलदार सुचित्रा आमले यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. गुंड प्रवृत्तीच्या वातावरणात वावरणाऱ्या तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. मला पोलीस संरक्षण मिळावे’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड पोलीस स्टेशनला समक्ष येऊन लेखी तक्रार केली आहे.