‘डॅडी’च्या अखिल भारतीय सेना पिंपरी-चिंचवड शहर पदाधिकारी महिलेचा विनयभंग
- पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – ‘डॅडी’ नावाने देशभरात ओळखल्या जाणा-या मुंबईतील अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेना पक्षाचा पिंपरी-चिंचवड शहराचा कारभार सांभाळणा-या पदाधिकारी महिलेचा तरुणाने विनयभंग केल्याची तक्रार पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकाराने राजकीय पक्षातील महिला पदाधिका-यांत खळबळ उडाली आहे.
आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षात उलथापालथ सुरू आहे. सत्तेत आपल्याही पक्षाचा खासदार असावा, यासाठी अखिल भारतीय सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण गवळी यांच्या पत्नी व पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आशा उर्फ ममी गवळी पंधरा दिवसांपूर्वी मराठवाड्याच्या दौ-यावर होत्या. निवडणूकपूर्व काळात पक्षाला बळकटी देण्यासाठी त्या जीवाचे राण करत असतानाच पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या पदाधिकारी महिलेचा विनयभंग झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मॅडी उर्फ मोहम्मद शेख (वय 23, रा. सम्राट हौसिंग सोसायटी, एच बिल्डींग, रुम नंबर 7, पहिला मजला मिलींदनगर, डीलक्स चौकासमोर, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला पदाधिकारी बचत गटाच्या व्यवहारासंदर्भात आपल्या सासूसोबत चर्चा करत होत्या. त्यावेळी मॅडी त्याठिकाणी आला. ‘मेरी नींद खराब हो रही है, तुम्हारा मूह बंद करो’, असे म्हणून त्याने तक्रारदार महिलेशी शिवीगाळ केली. दरम्यान, झालेल्या चकमकीत त्याने तक्रारदार महिलेशी शिवीगाळ करून विनयभंग केला. त्याच्या विरोधात पिंपरी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.