ठेकेदार रस्ते खोदणार अन्ं महापालिका डांबरीकरणावर उधळपट्टी करणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/1-15.jpg)
24 बाय 7 योजनेतंर्गत खोदलेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणास स्थायीकडून मंजूरी
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड महापालिकेची अमृत योजनेच्या 24 बाय 7 अतंर्गत संपुर्ण शहरभर रस्ते खोदाई सुरु आहे. रस्ते खोदाई केलेल्या कामात संबंधित ठेकेदाराने त्या रस्त्यांची दुरुस्ती करणे हे बंधनकारक आहे. मात्र, पालिकेच्या स्थापत्य विभागाने नव्याने निविदा प्रक्रिया राबवून प्रभाग क्रमांक 11 आणि 12 मधील खोदाई केलेले सर्व रस्ते डांबरीकरण करण्यात येणार आहेत. त्या कामास आज (शुक्रवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या अमृत योजनेतून दोन टप्प्यात 24 बाय 7 प्रकल्प राबविण्यात येत आहे. या कामात पाणी पुरवठ्याचे पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. त्यात पहिल्या 40 टक्के आणि दुस-या 60 टक्के या दोन टप्प्याचे काम सुरु आहे. त्या कामामुळे सर्वच प्रभागातील गल्लोगल्ली रस्ते खोदाई करण्यात आलेली आहे. रस्ते खोदाईमुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून रस्ते दुरुस्ती तात्काळ करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
त्यामुळे ज्या संबंधित ठेकेदाराने रस्ते खोदाई केली. त्याच ठेकेदाराकडून महापालिकेचे खोदाई केलेले रस्ते पुन्हा डांबरीकरण करुन देणे हे बंधनकारक आहे. मात्र, स्थापत्य विभाग संबंधित ठेकेदाराकडून रस्ते डांबरीकरण न करता त्या कामासाठी स्वतंत्रपणे निविदा प्रक्रिया राबवू लागली आहेत. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नूकसान होवून करदात्या नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी होवू लागल्याचे दिसत आहे.
महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विधी सभापती आश्विनी बोबडे, माजी क्रीडा सभापती तथा नगरसेवक संजय नेवाळे, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे यांच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये स्थापत्य विभागाने मेहेरबानी दाखवत रस्ते डांबरीकरण करण्यास स्वतंत्र निविदा राबविली आहे. त्यामुळे 24 बाय 7 योजनेतून रस्ते खोदाई झालेल्या नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, कुदळवाडी भाग, कृष्णानगर, शरदनगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, पुर्णानगर, स्वस्त घरकुल प्रकल्प, अजंठानगर, दुर्गानगर परिसरातील सर्वच रस्ते स्थापत्य विभाग डांबरीकरण करणार आहे.
दरम्यान, महापालिकेच्या 24 बाय 7 प्रकल्पातंर्गत खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यास मे.क्लीन्सी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांनी 74 लाख 99 हजार 885 रुपये मधून राॅयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्जेस वगळून 73 लाख 77 हजार 666 रुपये निविदा दर मागविण्यात आले आहेत. त्यानूसार सदर काम उपरोक्त ठेकेदाराकडून 73 लाख 77 हजार 666 पेक्षा 28.51 टक्के कमी म्हणजेच 53 लाख 96 हजार 512 रुपये पर्यंत काम करुन घेण्यास व निविदेतील नियम व अटीप्रमाणे करारनामा करुन घेण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
तसेच प्रभाग क्रमांक 12 मधील पाणी पुरवठा व इतर सेवा वाहिन्यांकरिता खोदलेले चर दुरुस्त करणे व इतर ठिकाणी डांबरीकरण करण्यात येणार आहे. मे. साईप्रभा कन्ट्रक्शन यांनी 52 लाख 46 हजार 588 रुपये मधून राॅयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्जेस वगळून 51 लाख 65 हजार 827 रुपये निविदा दर मागविणेत आले आहे. सदरचे काम ठेकेदाराकडून 51 लाख 65 हजार 827 पेक्षा 33 टक्के कमी म्हणजेच 35 लाख 40 हजार 315 पर्यंत काम करुन घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.