टाकवे खुर्द येथे बिबट्याचा वावर, ग्रामस्तांमध्ये घबराट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/3tiger_21.jpg)
लोणावळा – कार्ल्याजवळील टाकवे खुर्द येथे बिबट्याचा वावर आढळल्याने ग्रामस्तांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. वनखात्याने अद्याप दुजोरा दिला नसला तरी खबरदारीची उपाय म्हणून वनखात्याच्या वतीने परिसरात गस्त घालण्यात येत असून बिबट्यांचा माग काढण्यात येत आहे.
टाकवे खुर्द गावालगत डोंगराची रांग आणि जंगल आहे. डोंगरलगत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना तीन दिवसांपुर्वी बिबट्याची मादी आणि दोन पिल्ले दिसली. भऱवस्तीत ही पिल्ले आल्याने नागरिकांनी त्यांना पिटाळले. मात्र त्यांचा वावर सातत्याने होत असल्याने ग्रामस्तांमध्ये चांगलीच घबराट पसरली आहे. ग्रामस्तांनी याबाबतची माहीती वनखात्यात ताबडतोब दिली. शिरवता वन परिक्षेत्र अधिकारी संजय मारणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिसर पिंजून काढत शोध घेतला. डोंगराच्या कडेलाच घर असल्याने ग्रामस्तांच्या नजरेस बिबट्याची पिल्ले नजरेस आली असे सांगत बिबट्याच्या भितीमुळे रात्र जागून काढावी लागत असल्याचे टाकवे खुर्दचे माजी सरपंच विजय गरुड यांनी सांगितले.
रात्रीच्या वेळी टॉर्च किंवा वाहनांच्या दिव्यांचा प्रकाशझोतात बिबट्याचे डोळे चमकतात असे सांगत ग्रामस्तांच्या वतीने फटाके फोड़त त्यांना पिटाळण्यात येत आहे. ग्रामस्तांमध्ये भितीचे वातावरण असून लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत त्यामुळे वनखात्याने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात असे गरुड म्हणाले.
शिरवता वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मारणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वनखात्याच्या वतीने कर्मचाऱ्यांची रात्रभर गस्त सुरु आहे. अद्याप कोणावर हल्ला किंवा नुकसाण झाले नाही. बिबट्या किंवा त्याची पिल्लांचा माग घेतला जात असून ग्रामस्तांनीही खबरदारी घ्यावी असे आवाहन मारणे यांनी केले.