”छत्रपतींच्या मावळ्याचं “संसदेत”पहिलं पाऊल, मुहूर्त “शिवराज्याभिषेक दिनाचा”!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/udy1_201906248455.jpg)
- संसदेत पाऊल ठेवताच डाॅ. अमोल कोल्हेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे घेतलं दर्शन
पुणे – छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हेंना शिरुर मतदारसंघातील जनतेनं खासदार केलं. त्यानंतर आज पहिल्यांदाच कोल्हे यांनी लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत पाऊल ठेवलं आहे. संसदेत जाताच कोल्हे यांनी सर्वप्रथम तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन आनंद व्यक्त केला आहे. तसेच शिवराज्याभिषेकदिनी संसदेत आपलं पाऊल पडल्याचेही कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन म्हटले आहे.
अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने शिरुर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात कोल्हे यांनी शिवसेनेच्या खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत केले आहे. कोल्हे यांना 635830 तर पाटील यांना 577347 मतं मिळाली आहेत. त्यामुळे कोल्हे यांचा 58483 मतांनी विजय झाला आहे. विजयानंतर प्रथमच आणि खासदार बनल्यानंतरही आज प्रथमच त्यांनी दिल्लीत संसदभवनात पाऊल ठेवलं. संसेदत पोहोचल्याचा मनस्वी आनंद त्यांनी व्यक्त केला आहे. ”छत्रपतींच्या मावळ्याचं “संसदेत”आज पहिलं पाऊल आणि मुहूर्त “शिवराज्याभिषेक दिनाचा”! अभिमान, कृतज्ञता आणि जबाबदारी!!!, असे म्हणत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्याचा फोटोही शेअर केला आहे.
दरम्यान, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे सर्वसामान्य जनतेच्या खुप अपेक्षा आहेत. ते येत्या पाच वर्षांत यातून मार्ग काढतील, अशी अपेक्षा ते बाळगून आहेत.