चुलीवर भाकरी भाजून केला भाजप सरकारचा निषेध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/gas.jpg)
- गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अनोखे आंदोलन
पिंपरी – वाढती महागाई आणि पेट्रोल, डिजेलची दरवाढ, यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. पेट्रोल, डिजेल दरवाढ केल्यानंतर आता घरगुती गॅसच्या दरातही सरकारने वाढ केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने गॅस दरवाढीविरोधात चुलीवर भाकरी भाजून मंगळवारी (दि. 5) सरकारच्या विरोधात आंदोलन केले.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नगरसेविका विनया तापकीर, संगीता ताम्हाणे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, पुष्पा शेळके, शकुंतला भाट, सुप्रिया पवार, जयश्री पाटील, विद्या दिसले, दिपाली देशमुख, मंगल ढगे, रंजना कराळे, गंगा धेंडे, मनिषा गटकळ, कविता खराडे, रूपाली गायकवाड, सविता धुमाळ, संगीता जाधव, शिल्पा बिडकर आदी सहभागी झाले होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी चुली मांडून भाकरी भाजत गॅस दरवाढीचा निषेध केला. गॅस दरवाढ करणा-या केंद्र, राज्य सरकारचा निषेध, नागपूरचा पोपट काय म्हणतो, गॅस दरवाढ मागे नाय म्हणतो, भाजपचे हेच का अच्छे दिन, अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.
भाजप सरकारने पेट्रोलची दरवाढ केलीच त्यापाठोपाठ गॅसची दरवाढीही केली आहे. सर्वसामान्यांचे या दोन्ही गोष्टींच्या दरवाढीमुळे बजेट कोलमडले आहे, असे महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर म्हणाल्या.