breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

चाकणमध्ये कच-याच्या ढिगा-यात सापडला माणसाच्या हाताचा पंजा

चाकण –  खराबवाडी ( ता.खेड ) गावच्या हद्दीतील कचरा डम्पिंग डेपोमध्ये एका पिशवीत शुक्रवारी ( दि. ७ ) चक्क माणसाच्या हाताचा तुटलेला व रक्ताळलेला पंजा आढळल्याने चाकण परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत घंटा गाडीच्या चालकाने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून कचरा डम्पिंग मधील सर्व कचऱ्याची तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. खराबवाडी येथील दगड खाणीत अनेक गावचा कचरा येत असल्याने तुटलेल्या हाताचा पंजा कुणाचा? याचा शोध घेणे पोलिसांपुढे दिव्य ठरणार आहे.

घंटागाडी चालक दत्तात्रय मुकुंद गायकवाड ( वय ३१, रा. वाकी बुद्रुक, ता.खेड, जि. पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, घंटागाडी चालक दत्तात्रय गायकवाड यांची थ्री व्हीलर ? पे रिक्षा क्रमांक ( एम एच १४ / ईएम ७३७५ ) ही चाकण नगरपरिषदेला कचरा गोळा करण्यासाठी भाडे तत्वाने लावली असून ही रिक्षा वॉर्ड क्रमांक १८ मध्ये कचरा गोळा करण्याचे काम करते.

शुक्रवारी ७ जूनला सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास गायकवाड यांनी चाकण शहरातील माळआळी, सिकीलकर हॉस्पिटल, चाकण बाजारपेठ इत्यादी ठिकाणाहून कचरा गोळा करून बिरदवडी जवळील खराबवाडीच्या कचरा डम्पिंग ग्राऊंडवर कचरा खाली केला. यावेळी येथील सुरक्षारक्षक अनिल लेंडघर ( रा. राणूबाईमळा, चाकण ) यांनी गायकवाड यांना सांगितले कि, सदर गाडी खाली करीत असताना गाडीतील कचऱ्यातील पिशवी चाळत असताना भंगार गोळा करणाऱ्या महिलेस एका माणूस जातीच्या हाताचा तुटलेला पंजा, एका बाजूस रक्ताळलेला व सुरकुतलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. त्यानंतर सदर घटनेची खात्री करून चाकण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी कचरा तपासणीच्या सूचना नगरपरिषद प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच परिसरातील खासगी रुग्णालयातून हा पंजा कचऱ्यात आला की काय याचाही तपास पोलीस घेत आहेत. शहरी वस्तीतून हाताचा पंजा कचऱ्यात आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button