घरगुती इलेक्ट्रीक मीटर रिंडीग घेणारा एसीबीच्या अटकेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/crime-1-1.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
घरगुती इलेक्ट्रिक मीटर दुकानाच्या वापरासाठी बसवून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेताना मीटर रिडींग घेणा-या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि. 24) रुपीनगर, तळवडे येथे सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली आहे.
शांताराम पोपट सोनवणे (वय 33, रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुखदेव मुरलीधर म्हस्के (वय 52, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शांताराम हा मीटर रिडींग घेण्याचे काम करतो. त्याने फिर्यादी यांना यांच्या दुकानात घरगुती वापराचे इलेक्ट्रिक मीटर बसवून देतो. यामुळे वीजबिल कमी येईल, असे सांगितले. त्यासाठी लाच मागितली. तडजोड करून 15 हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी शांताराम याला रंगेहाथ पकडले. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी तपास करीत आहेत.