गणेश विसर्जनसाठी प्रभाग स्तरावर फिरत्या हौदाची त्वरित व्यवस्था करावी: विरोधी पक्षनेते नाना काटे
![Accelerate the work of Grade Separator at Jagtap Dairy Sai Chowk - Nana Kate](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/nana-kate.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरात नदीकाठावरील घाटावर गणेश विसर्जनास कोरोनामुळे प्रतिबंध केलेला आहे. मात्र गणेश विसर्जनासाठी महापालिकेने कोणतीही इतर व्यवस्था उपलब्ध करून दिली नसल्यामुळे गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे पुणे पालिकेप्रमाणे प्रत्येक प्रभागात गणेश विसर्जनसाठी फिरत्या हौदांची व्यवस्था महापालिकेने करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
नाना काटे यांंनी यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सालाबाद प्रमाणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेशभक्तांनी मनोभावे श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करत शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झालेले आहे. परंतु गणेश विसर्जनबाबत प्रशासनाने शहरातील नदीकाठावरील घाटावरील विसर्जनास कोरोनामुळे प्रतिबंध केलेला आहे. घरातच गणपती बसवा व घरातच विसर्जन करा असे आवाहन महापालिकेमार्फत केले आहे. परंतु हेच आवाहन गणपती येण्यापुर्वी पाच दिवस अगोदर केले असते तर नागरिकांनी कमी उंचीच्या व प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्त्या न आणता शाडूच्या मूर्त्या आणल्या असत्या. परंतु आता नागरीकांनी प्लॉस्टर ऑफ पँरीसच्या घरीच्या घरी विसर्जन होणार नाहीत, कारण त्या पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे मुर्तींची विटंबना होईल व नागरीकांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. प्रशासनाचा ढिसाळ कारभाराचा नुमना पुन्हा एकदा समोर आलेला आहे.
त्यामुळे पुढील पाच, सात, नवव्या दिवशी तसेच अनंत चर्तुथीच्या विसर्जन दिवशी शहरातील भक्तांच्या भावनांशी न खेळता गणेश विसर्जनांसाठी पुणे मनपाच्या धर्तीवर फिरत्या हौदाची संकल्पना प्रभाग स्तरावर राबविण्यात यावी. तसेच मुर्ती विरघळण्यासाठी आवश्यक असणारी पावडरसुध्दा उपलब्ध करुन द्यावी. त्याच प्रमाणे शहरातील सामाजिक संस्था गणेश मुर्तीचे दान स्वीकारतात त्यांना सुध्दा गणेश मुर्ती दान करण्यास परवानगी देण्यात यावी. अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.