breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खासदार बारणे यांच्यात विकासावर बोलण्याचे धाडस नाही – आमदार जगताप

  • भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची टिका
  • खासदार बारणे आव्हान स्वीकारत नसल्याचाही आरोप

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आकुर्डी येथील पक्षाच्या कार्यक्रमात टिकात्मक विधान केल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे आणि भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात जोरदार शाब्दीक चिखलफेक सुरू झाले. दोघांकडून एकमेकांवर आरोपाच्या फैरी झोडल्या जात आहेत. त्यातच आता खासदार बारणे यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना जगतापांनी आव्हान केले आहे. खासदार बारणे यांनी माझ्यावर जेव्हा जेव्हा टिका किंवा आरोप केले, तेव्हा प्रत्येकवेळी विकासावर बोलण्याचे मी त्यांना आव्हान दिले आहे. परंतु, त्यांनी ते कधीच स्वीकारले नाही, अशा शब्दांत जगतापांनी वस्तुस्थिती समोर मांडली आहे.

खासदार बारणे हे विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी नळावरची भांडणे करण्यातच धन्यता मानत आहेत. आम्ही विकासावर बोलण्याचे आव्हान दिले की, ते चुप्पी साधतात. वायफळ आरोप करून चर्चेत राहण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत. परंतु, फोटावाल्या खासदाराची ही बनवेगिरी शहरातील जनता आता खपवून घेणार नाही. खासदार म्हणून केलेली कामे जनतेला सांगण्यासाठी त्यांच्याकडे मुद्देच नाहीत. दहशतीच्या बळावर प्राधिकरणाच्या जागा ढापणाऱ्यांनी गुन्हेगारीवर बोलणे हास्यास्पद आहे. माझ्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढल्याचे या महाशयांना वाटत असेल, तर त्यांनी खासदार असल्याचे भान ठेवावे. त्यांनी माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार करून “दूध का दूध पाणी का पाणी करावे”, असे खुले आव्हान भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना दिले आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, खासदार बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात कोणती भरीव कामे केली हे दुर्बिण घेऊन शोधावे लागणार आहे. ते विकासकामांवरून भांडल्याचे पाच वर्षांत कधीच दिसले नाही. केवळ निवेदने देऊन चमकोगिरी करण्यातच त्यांनी धन्यता मानली. बारणे यांनी माझ्यावर जेव्हा जेव्हा टिका किंवा आरोप केले, तेव्हा प्रत्येकवेळी विकासावर बोलण्याचे मी त्यांना आव्हान दिले आहे. परंतु, त्यांनी ते कधीच स्वीकारले नाही. त्यांनी शहरातील कचरा प्रश्नांवर आणि फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी ते राहत असलेल्या थेरगावपासूनच रस्ते अतिक्रमणमुक्त आणि स्वच्छतेला सुरूवात करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांना केले होते.

आता लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. जनतेला सामोरे जाताना काय विकासकामे केली हे खासदार बारणे यांना सांगावे लागणार आहे. परंतु, त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे कोणी कोणावर अतिक्रमण केले, कोण मौनी आमदार आहेत, हेच सांगून ते प्रसिद्धीत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या जिवावर खासदार होऊन त्यांनी पाच वर्षे हे पद उपभोगले. परंतु, या पदाचा वापर भाजपच्या कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी कधीच केला नाही. एवढेच नाही तर शिवसेनेच्या अमक्या कार्यकर्त्याला मोठे केले, हे सुद्धा ते सांगू शकणार नाहीत. उलट अनेक कट्टर शिवसैनिकांचे खच्चीकरण करून त्यांना राजकारणातूनच त्यांनी आऊट केले आहे. बारणे आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी दहशतीच्या बळावर प्राधिकरणाच्या अनेक जागा ढापल्या आहेत, हे उघड सत्य आहे. मागे हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर माझ्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा देणारे खासदार महाशय नंतर गप्प का बसले याचे उत्तर जनतेला द्यावे. प्राधिकरणाच्या ज्या काही जागा ढापण्यात आल्या आहेत, त्या सर्व प्रकाराची चौकशी करून सत्य उजेडात आणल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान जगतापांनी दिले आहे.

बारणे यांना दरवेळी संताजी धनाजीसारखा मीच दिसतो, हेच राजकीय वास्तव आहे. राजकारणात त्यांना नेहमी माझीच भिती वाटत आली आहे. एकीकडे पाच वर्षांच्या कार्यकाळात काहीच कामे केली नाहीत आणि दुसरीकडे माझ्यासारखा तगडा विरोधक पाहून ते वैफल्यग्रस्त बनले आहेत. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आणि हिंदुह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या पायाशी स्थान देण्याचे घोर पातक बारणे यांनी केले आहे. माझ्यावर टिका करण्यास तेच सुरूवात करतात. मी स्वतःहून त्यांच्यावर कधीच टिका केलेली नाही. आता तर या खासदार महाशयांनी शहरात माझ्यामुळे गुन्हेगारी वाढल्याची बोंब ठोकली आहे. बारणे यांची ही टिका म्हणजे हास्यास्पदच म्हणावे लागेल. माझ्यामुळे गुन्हेगारी वाढल्याचे त्यांना वाटत असेल, तर त्यांनी खासदार असल्याचे लक्षात ठेवावे. खासदारपद हे केवळ मिरवण्यासाठी नसते. या पदाला काही अधिकारही आहेत, हेच त्यांना आतापर्यंत कळलेले नाही. माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार देऊन दूध का दूध पाणी का पाणी करण्यापासून त्यांना कोणीही रोखलेले नाही, असे आव्हान त्यांनी दिले.”

 

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button