खंडीत वीज पुरवठ्यामुळे मोशीतील रहिवासी त्रस्त; आमदार, नगरसेवकांचे होतेय दुर्लक्ष
![There will be 36 hours power supply in the area](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/2019_1large_Mahavitaran_2_266.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
मोशी परिसरात वारंवार दहा ते पंधरा तास वीज पूरवठा खंडीत होत आहे. खंडीत वीज पुरवठ्यामुळे सोसायटीतील सदनिकाधारकांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे पर्यायी वीज पुरवठा उभारण्यास पैसा खर्च करावा लागत आहे. तर नोकरदारांना वर्क फ्रॉम होम करण्यात अनेक अडथळे येत आहे. याकडे आमदार व नगरसेवकांचे दुर्लक्ष होवू लागले आहे.
सोसायटीतील सदनिकांसमोरील भाग, जीना व पार्किंग अशा सामुदायिक वापर असलेल्या ठिकाणी वीज नसल्याने येथील वीज अत्यावश्यक असल्याने त्यासाठी 30 ते 35 हजार रुपयांचे डिझेल लागत आहे. सततच्या वीज खंडित होण्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या बहुसंख्य नोकरदार ऑनलाइन काम करणे अशक्य होत असून दिलेले काम वेळेत न झाल्याने कंपनीकडून त्यांना समज मिळत आहे. त्यामुळे कंपनीकडून काही कारवाई होईल काय? अशा भितीच्या सावटाखाली त्यांना रहावे लागत आहे.
वीजच नसल्याने परिणामी इंटरनेट सेवा बंद पडत असून व मोबाईल लॅपटॉप चार्जिंग करणे शक्य नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. अशा विविध अडचणींचा सामना मोशीतील स्वराज गृहनिर्माण सोसायटी मधील सुमारे 622 सदनिकाधारक करत आहेत.
मोशीतील स्वराज गृहनिर्माण सोसायट्यांमधील हा वारंवार वीज पुरवठा खंडित होणारा प्रश्न संबंधितांनी कायमचा सोडवावा अन्यथा चिखली मोशी गृहनिर्माण सोसायटी फेडरेशनच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा येथील सदनिकाधारक बाळाप्पा माने, गिरीश उधाने, अमित धर्मातले, श्री महेश नेवाले, एकनाथ कुरणे, स्वप्नील पाटील, ज्ञानेश्वर घाडगे, हुले, प्रवीण हुले, निलेश आंबेडकर, धम्मापल मस्के, भिवाजी काळे, गणेश मांडे, संतोष बिरादार, मीनल धर्मातले आदींनी केली आहे.
”दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे व इतर वेळीही विविध कारणांनी येथील फिडर बंद पडतो. त्याचे काम करण्यास तेवढा वेळ लागतोच. येथील रस्त्यांची वारंवार होणारी खोदाई यामुळेही केबल तुटून वीज पुरवठा खंडीत होतो.” – माऊली नाईक, महावितरण तंत्रज्ञ, मोशी विभाग.