breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘कोरोना योध्दा’ डाॅक्टरांना कायम करण्यावरुन सभागृहात भाजप नगरसेवकांमध्ये मतभेद

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत डाॅक्टरांना कायम करण्यावरुन भाजप नगरसदस्यांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले. एकीकडे ‘कोविडच्या काळात डॉक्टर हे देवदूत, कोरोना योध्दा आहेत. असं बोलायचे. मात्र, सभागृहात डाॅक्टरांना कायम करण्याच्या विषयावरुन विरोध दर्शविला गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा विरोध नसतानाही सत्ताधाऱ्यांमधील गोंधळामुळे डॉक्टरांचा विषय २६ आॅगस्टपर्यंत तहकूब ठेवला.

महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. या सभेत डॉक्टर भरती प्रक्रिया आणि डॉक्टरांना कायम करण्याच्या विषयावरून सत्ताधारी भाजपात मतभेद असल्याचे दिसून आले. रुग्णालयातील रुग्णसेवेवरून टीका केली. उपमहापौर तुषार हिंगे यांनी डॉक्टरांसह रुग्णालयातील स्टॉफ नर्स, घंटागाडी कर्मचारी, सुरक्षारक्षक, अ‍ॅम्ब्युलन्स चालक अशा सर्वांनाच कायम करावे, अशी उपसूचना दिली.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे कोरोना कालखंडातील कामाचे कौतुक करताना सदस्यांनी आरोग्य वैद्यकीय विभागाच्या गलथानपणावर हल्ला चढविला. डॉक्टरांच्या विषयावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी कोविडच्या काळात यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आलेले बरे-वाईट अनुभव सांगितले.

डॉक्टरांच्या विषयास विरोध नसल्याचे सांगत विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले यांनी वैद्यकीय विभागातील दोष सभागृहासमोर मांडले. डॉक्टरांचा विषय आजच करायचा की नाही? यावरून भाजपात मतभेद दिसले. महापौरांचे मते आजच डॉक्टरांचा विषय मंजूर करावा, असे होते. मात्र, सभागृहातील भाजपाचे काही सदस्य यावर सर्वसमावेशक चर्चा करून निर्णय घ्यावा, याबाबत आग्रही होते. सभेत योगेश बहल, डॉ. वैशाली घोडेकर, नितीन काळजे, भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, सीमा साळवे, आशा शेडगे, संदीप वाघेरे, विकास डोळस, सुजाता पलांडे, बाळासाहेब ओव्हळ यांनी मते मांडली.

या विषयास अनुसरून अन्य कोणत्या रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश करायचा याबाबत गटनेत्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. तोपर्यंत २६ आॅगस्टपर्यंत सभा तहकूब करावी, अशी सूचना सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी मांडली. त्यानंतर सभा तहकूब केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button