कोरोना पेशंटच्या ‘High Risk Contact’ मधील एका पोलिसासह दहाजण मनपा रूग्णालयात दाखल
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोनाच्या पॉझिटिव्ह पुरुष आणि महिलेच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एका पोलिसासह दहा कोरोना संवशयीतांना गुरुवारी (दि. ९) महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी आज एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी (दि . 9) एकाच दिवशी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामध्ये सकाळी एक महिला पॉझिटिव्ह आली होती. तर, रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये एका 47 वर्षीय पुरुषाचा आणि एका 50 वर्षीय महिलेचा समावेश होता. दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यातील पुरुष रुग हिंजवडी परिसरात कामाला होता. त्याला दोन दिवसांपूर्वी त्रास होत होता. त्यामुळे तो चिंचवड परिसरातील महापालिकेच्या एका दवाखान्यात गेला होता. तेथून त्याला वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
तो कोणाच्या संपर्कात आला होता याची माहिती प्रशासनाकडून काढली जात आहे . या रुग्णाला दवाखान्यात नेणारे पाच जण आणि त्याच्या जवळील तीघे अशा ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’ मध्ये आलेल्या आठ जणांना महापालिककेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे. तर, पुण्यातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेली महिला देखील कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. ही महिला गृहिणी होती. त्यामुळे या महिलेला कोरोनाची लागण कशी झाली. महिला कोणाच्या संपर्कात आली होती हे शोधणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे .
या महिलेच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्या एका पोलिसासह दोघांना महापालिका रुग्णालयात रात्री उशिरा दाखल केले. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी आज एनआयव्हीकडे पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, यामध्ये पोलिसाचा समावेश असल्याने रिपोर्ट काय येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.